नेपाळमध्ये मंगळवारी झालेल्या भूकंपानंतर मदतकार्यासाठी गेलेले अमेरिकेचे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते, त्याचे अवशेष सापडले आहेत. अवशेषांच्या ठिकाणी तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले असून अमेरिकी तटरक्षक दलाचे ते हेलिकॉप्टर होते. दरम्यान नेपाळमध्ये आज भूकंपाचे तीन धक्के बसले असून पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारच्या भूकंपानंतर ११७ जण मरण पावले आहेत. आज सकाळी ७.२७ वाजता भूकंपाचा धक्का बसला त्याची तीव्रता ५.५ रिश्टर होती. त्याचे केंद्र धाडिंग जिल्ह्य़ापासून ८० कि.मी. अंतरावर होते. त्याआधी सकाळी ३.३८ व ४.०७ वाजता भूकंपाचे अनुक्रमे ४.१ रिश्टर व ४.३ रिश्टर तीव्रतेचे धक्के बसले. दोलखा जवळ त्यांचा केंद्रबिंदू होता. २५ एप्रिलच्या भूकंपानंतर एकूण २१५ धक्के बसले आहेत.
अमेरिकेच्या तटरक्षक दलाचे यूएच १ वाय ह्य़ू हेलिकॉप्टर मंगळवारी बेपत्ता झाले होते. त्यात सहा नौसैनिक होते व नेपाळच्या लष्करी दलांचे दोन जवान होते. मंगळवारी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर अमेरिकेचे हेलिकॉप्टर मदतकार्यासाठी निघाले होते. ते दुर्घटनाग्रस्त झाल्याचे आज निष्पन्न झाले. नेपाळ लष्कराच्या हेलिकॉप्टरला अमेरिकेच्या बेपत्ता हेलिकॉप्टरचे अवशेष घोरथाली या पर्वतराजीच्या परिसरात दिसले. नेपाळ लष्कराने सांगितले, की दोलखा जिल्ह्य़ात कालिन चौक पर्वतीय भागात ११,२०० फूट उंचीवर हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत. संरक्षण सचिव ईश्वरीप्रसाद पौडय़ाल यांनी अमेरिकेचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचे सांगितले पण मृतांचे राष्ट्रीयत्व सांगितले नाही. अर्थमंत्री रामशरण महात यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की  हेलिकॉप्टर दोलखा भागात कालिन चौक परिसरात सापडले आहे. या ठिकाणी तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले असून कुणीही वाचल्याची शक्यता नाही. सापडलेले मृतदेह काठमांडूकडे आणले जात आहेत.