कोल्लमनजीकच्या पुट्टिंगल मंदिरातील अग्निकांडात गंभीर जखमी झालेला ४० वर्षांचा एक इसम गुरुवारी मरण पावल्यामुळे या घटनेत बळी पडलेल्यांची संख्या ११४ झाली आहे.
आगीत ५० टक्के भाजल्यामुळे एका रुग्णालयात उपचार सुरू असलेला स्थयन हा गुरुवारी सकाळी मरण पावल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. तो परावूर येथील इडायाड गावचा रहिवासी होता.
१० एप्रिलला झालेल्या या दुर्घटनेत जखमी झालेल्या तीनशेहून अधिक लोकांवर अद्याप तिरुवनंतपुरम आणि कोल्लमच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, समारंभातील आतषबाजीच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी सरकारने गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती.
अडूर प्रकाश, शिबू बेबी जॉन आणि व्ही. एस. शिवकुमार यांची तीन सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती दुर्घटना स्थळाला भेट देऊन अपघातामुळे झालेल्या मालमत्तेचे मूल्यांकन करणार असून पुनर्वसन कार्याचाही आढावा घेणार आहे.
सुमारे १०० वर्षे जुन्या असलेल्या पुट्टिंगल देवी मंदिरात रविवारी पहाटे विनापरवानगी आतषबाजी सुरू असताना त्यातील ठिणगी फटाके साठवून ठेवलेल्या खोलीत पडल्याने जबरदस्त स्फोट झाला होता व आग लागली होती.