पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्यानं मृत्यू झालेल्यांची संख्या ८६ झाली आहे. एकट्या तरन तारन जिल्ह्यात ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमृतसरमध्ये १२ आणि गुरदासपूरच्या बटाला येथे ९ जणांचा मृत्यू झाला. विषारी दारु प्रकरणात आतापर्यंत २५ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात तरन तारनच्या एसएसपींनी कारवाई करत दोन पोलिस ठाण्यांचे प्रभारी आणि एका डीएसपीला निलंबित केले आहे.

अंमली पदार्थांचा अवैध व्यवहार करणाऱ्या माफियांशी या अधिकाऱ्यांचा संबंध आहे का? याची चौकशी पोलिस करत आहेत. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाखा रुपयंची मदत जाहीर केली आहे. तर उत्पादन शुल्क विभागातील ७ अधिकारी, २ पोलीस उपअधीक्षक आणि ४ एसएचओंना निलंबित केलं आहे. तसंच त्यांची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.

पंजाबमध्ये विषारी दारु प्यायल्याने आत्तापर्यंत ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाब पोलिसांनी या प्रकरणात आणखी १७ लोकांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची संख्या २५ झाली आहे. तसंच १०० पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारीही केली आहे. पंजाबमधील अमृतसर, बाटला आणि तरनतारन या तीन जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री विषारी दारु प्यायल्याने २१ जणांचा मृत्यू झाला. पहिले पाच मृत्यू २९ जुलै रोजी नोंदवण्यात आले होते.  पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी यापूर्वीच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी एसआयटीही तयार केली गेली आहे. ही एसआयटी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल. विषारी दारू बनवणाऱ्या आणि पुरवठा करणाऱ्यांना लवकरच अटक केली जाईल, असं पंजाब सरकारने म्हटलंय.