परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह हे सौदीला रवाना

सौदी अरेबियात हज यात्रेत मरण पावलेल्या भारतीयांची संख्या आता ७४ झाली असल्याचे सांगण्यात आले असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या पंचवीस वर्षांतील या भीषण दुर्घटनेत अनेक लोक बेपत्ता आहेत.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले, की हज चेंगराचेंगरीनंतर सौदी अरेबियाने मृतांची पुढील यादी जाहीर केली असून त्यात एकूण ७४ भारतीय मरण पावल्याचे निष्पन्न झाले आहे. अनेक भारतीय व इतर देशांचे लोकही वार्षिक हज यात्रेत बेपत्ता झाले होते. मक्का येथे २४ सप्टेंबरला ही घटना घडली होती. स्वराज यांनी आधी ७८ जण बेपत्ता असून सरकार त्यांना शोधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले होते. हज यात्रेत मरण पावलेल्यांची एकूण संख्या १०३६ झाली आहे. परराष्ट्र राज्य मंत्री व्ही.के.सिंह हे सौदी अरेबियाला रवाना झाले असून ते बेपत्ता भारतीयांना शोधण्यासाठी समन्वय करीत आहेत. स्वराज यांनी सिंह यांना सौदी अरेबियात जाण्यास सांगितले होते. विविध देशांच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आम्ही आहोत, असे सौदी अरेबियाने म्हटले आहे. सैतानाला दगड मारण्याच्या विधीच्या वेळी मीना येथे पाच मजली जमारत पुलावर चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना घडली होती. ११ सप्टेंबरला मक्का येथे मोठय़ा मशिदीच्या परिसरात क्रेन कोसळून १०० जण ठार झाले होते, त्यात ११ भारतीयांचा समावेश होता.