नोटबंदीच्या निर्णयानंतर बँकेबाहेर गर्दी वाढली असून सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. पण केंद्र सरकारचा हा निर्णय नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. गेल्या सहा दिवसांत नोटबंदीच्या निर्णयामुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. पैशांअभावी उपचार न मिळणे, पैसे नसल्याने निराश होऊन आत्महत्या केल्याच्या घटनांचा यामध्ये समावेश आहे.
नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबररोजी पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर चलनाचा तुटवडा निर्माण झाला असून व्यवहारही मंदावले आहेत. याचा फटका गोरगरीब वर्गाला बसत असून पैसे नसल्याने आत्महत्या केल्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूचा घेतलेला हा आढावा….

आत्महत्येच्या घटना
१. दिल्लीत २४ वर्षीय महिलेने राहत्या घरी आत्महत्या केली. नोटा बदलून न मिळाल्याने महिला हताश झाली होती.
२. गुजरातमधील सुरतमध्ये ५० वर्षीय महिलेने आत्महत्या केली. रेशन दुकानदाराने जुन्या नोट स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यामुळे महिलेला कुटुंबासाठी अन्नधान्य घेता आले नव्हते.
३. उत्तरप्रदेशमधील शामलीमध्ये २० वर्षाच्या महिलेने आत्महत्या केली. महिलेचा भाऊ बँकेत नोट बदलण्यासाठी गेला होता. मात्र त्याला नोट बदलून मिळत नव्हती.
४. कर्नाटकमधील चिकबल्लापूरमध्ये ४० वर्षाच्या महिलेने आत्महत्या केली. मद्यपी पतीपासून लपवत त्या महिलेने १५ हजार रुपये वाचवले होते. या नोटा बदलण्यासाठी बँकेत जात असताना महिलेकडील पैसे हरवले आणि यातून तिने आत्महत्या केली.
५. छत्तीसगडमधील राजगडमध्ये ४५ वर्षाच्या शेतक-याने आत्महत्या केली होती. सलग तीन दिवस हा शेतकरी बँकेत तीन हजार रुपये बदलून घेण्यासाठी बँकेत जात होता. शेतक-याचा मुलगा तामिळनाडूत अडकला होता आणि त्याला तातडीने पैसे पोहोचवण्याची गरज होती. पैसे मिळत नसल्याने शेतकरी निराश झाला.
६. तेलंगणमधील ५५ वर्षीय महिलेने तिच्याकडील ५४ लाख रुपयांना आता मूल्य उरलेले नाही असे वाटत होते. पतीच्या उपचारासाठी जागा विकून महिलेने हे पैसे जमा केले होते. नोटबंदी जाहीर झाल्यानंतर त्या महिलेने आत्महत्या केली.
उपचार नाकारल्याने मृत्यू
रुग्णालय, मेडिकलमध्ये जुन्या नोटा स्वीकारल्या जातील असे सरकारने जाहीर केले आहे. मात्र त्यानंतरही जुन्या नोटांमुळे उपचार न मिळाल्याने रुग्णाच्या मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
१. मुंबईतील एका रुग्णालयात नवजात बाळाला रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. मुलाच्या पालकांकडे नवीन नोटा उपलब्ध नसल्याने रुग्णालयाने मुलाला दाखल करुन घेण्यास नकार दिला होता.
२. उत्तरप्रदेशमधील बुलंदशहरमध्ये लहान मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. मुलाच्या पालकांनी १० हजार रुपये भरावे अशी रुग्णालयाची मागणी होती. पण नोटबंदीमुळे पालकांकडे पैशांची चणचण होती.
३. १८ महिन्याच्या बाळाचा औषध न मिळाल्याने मृत्यू झाला. खासगी रुग्णालयाने ५०० आणि हजारच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला होता.
४. उत्तरप्रदेशमधील मैनपूरी येथे एक वर्षाच्या कुशला ताप आला होता. त्याच्या वडिलांकडे शंभर रुपयांच्या नोटा नव्हत्या पण त्यांच्याकडे पाचशेची नोट होती. ही नोट कोणीही स्वीकारत नव्हते.
५. राजस्थानमधील पाली जिल्ह्यात रुग्णवाहिकाचालकाने पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे नवजात बाळाला रुग्णालयात दाखल करता आले नाही आणि त्या बाळाचा मृत्यू झाला.

नोटबंदीनंतर पत्नीची हत्या

पश्चिम बंगालमधील हावडा येथे नोटबंदीच्या कारणावरुन पतीने थेट पत्नीची हत्या केली. त्याची पत्नी पैसे काढण्यासाठी एटीएमच्या रांगेत उभी होती. पण पैसे न मिळाल्याने ती घरी परतली. पत्नी अजून काही वेळ रांगेत थांबली असती तर तिला पैसे मिळाले असते असे पतीचे म्हणणे होते. या वादातून त्याने थेट पत्नीची हत्या केली.

ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

नोट बदलण्यासाठी रांगेत उभे असताना किंवा नोटबंदीचा धसका घेऊन ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या आत्तापर्यंत १३ घटना घडल्या आहेत.