नवी दिल्ली : भारतात २०१५ पर्यंत एक चतुर्थाश मृत्यू हे हृदयाच्या आजारांनी झाले होते व ग्रामीण लोक तसेच तरुणांमध्ये या रोगाचे परिणाम जास्त दिसून येत आहे, असे एका अभ्यासात म्हटले आहे. टोरांटो येथील सेंट मायकेल हॉस्पिटलच्या सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ रीसर्च या संस्थेचे संचालक प्रभात झा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या संशोधनानुसार भारतात इस्किमिक हार्ट डिसीजमुळे ३० ते ६९ वयोगटांतील लोक मरण्याचे प्रमाण २००० ते २०१५ या काळात ग्रामीण लोकांमध्ये शहरी लोकांपेक्षा जास्त होते. भारतात या काळात पक्षाघाताने मरण्याचे प्रमाण कमी झाले, पण ईशान्येकडील राज्यात त्याचे प्रमाण वाढले. राष्ट्रीय सरासरीपेक्षा या राज्यात पक्षाघाताने मरणाऱ्यांचे प्रमाण तीन पट अधिक आहे, असे लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे. देशभरात हृदयरोगाचे प्रमाण वाढले पण पक्षाघात काही राज्यात वाढला हे आश्चर्यकारक असल्याचे झा यांनी म्हटले आहे. हृदयरोगातील निम्मे मृत्यू हे औषधे नियमित न घेतल्याने झाले आहेत. जगभरात इस्किमिक हार्ट डिसीज व पक्षाघात या दोन कारणांनी लोकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. भारतात अनेक मृत्यू हे घरात व औषधांअभावी होतात असे यात म्हटले आहे. यात शेकडो जनगणना कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन माहिती गोळा केली होती व  त्याचे विश्लेषण दोन डॉक्टरांनी केले होते. २०३० पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टात हृदयविकाराचे प्रमाण कमी करण्याची गरज असून त्यासाठी हृदयविकार व पक्षाघाताचे अनपेक्षित घटक विचारात घ्यावे लागतील असे त्यांचे म्हणणे आहे.