प्रशांत भूषण यांचे आव्हान

जनलोकपाल विधेयकातील तरतुदी सौम्य करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेशी प्रतारणा केली असल्याचा आरोप स्वराज अभियानचे नेते प्रशांत भूषण यांनी केला आहे. यावर जाहीर चर्चा करण्याचे आव्हानही प्रशांत भूषण यांनी दिले आहे.
तथापि, आपने दिल्ली चर्चा आयोगाचे उपाध्यक्ष आशीष खेतान यांच्यावर भूषण यांचा प्रतिवाद करण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे केजरीवाल जाहीर चर्चेला घाबरले असल्याचे भूषण यांनी म्हटले आहे.
दिल्ली मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनलोकपाल विधेयक काही दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आले, जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला. मात्र भ्रष्टाचारविरोधी चळवळ आणि देशाशी प्रतारणा करण्यात आली असल्याचे भूषण म्हणाले. त्यामुळेच आपण केजरीवाल यांना जाहीर चर्चेचे आव्हान दिले आहे. त्यामुळे सत्य कोण आणि खोटे कोण हे जनतेसमोर येईल, असेही ते म्हणाले.