दिल्लीत गेल्या वर्षी १६ डिसेंबरला झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या खटल्याचा निकाल बालगुन्हेगारी न्याय मंडळाने(ज्युवेनाईल न्यायालय) ३१ ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे.
दिल्ली बलात्कार प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अल्पवयीन आरोपीलाही सर्वसामन्य आरोपीप्रमाणे शिक्षा देण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. बलात्कार खटल्यातील अल्पवयीन आरोपीचा निकाल देऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील अल्पवयीन न्याय मंडळाला दिला होता. त्यानुसार अल्पवयीन न्याय मंडळाच्या प्रमुख आणि मुख्य न्यायदंडाधिकारी गितांजली गोयल यांनी या खटल्याची सुनावणी ३१ ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकली.
जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. अल्पवयीन व्यक्तीची व्याख्या ठरविताना त्याचे वय लक्षात घेण्यापेक्षा त्याची मानसिक आणि बौद्धिक क्षमता विचारात घ्यायला हवी, अशी मागणी स्वामी यांनी आपल्या याचिकेमध्ये केली आहे. २१ ऑगस्टला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे ही सुनावणी होण्यापूर्वी कोणताही निर्णय घेता येणार नाही. असेही न्यायाधिश गितांजली गोयल यांनी स्पष्ट केले आहे.