दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील बालगुन्हेगार आरोपीविरुद्ध बालगुन्हेगार न्याय मंडळासमोर सुरू असलेली चौकशी शुक्रवारी पूर्ण झाली. मात्र मंडळाने आपला निर्णय ११ जुलैपर्यंत राखून ठेवला आहे.
या प्रकरणातील एकूण सहा आरोपींपैकी बालगुन्हेगार आरोपी सर्वाधिक निर्दयी असल्याचा दावा पोलिसांनी केला. बालगुन्हेगार न्याय मंडळाचे अध्यक्षपद प्रधान दंडाधिकारी गीतांजली गोयल यांनी भूषविले. या प्रकरणी अंतिम युक्तिवाद ऐकल्यावर गोयल यांनी आपला निर्णय ११ जुलैपर्यंत राखून ठेवत असल्याचे स्पष्ट केले. सरकारी आणि बचाव पक्षाला त्या दिवशी आणखी स्पष्टीकरण देण्याची मुभाही देण्यात आली आहे.
सदर बालगुन्हेगार आरोपीने बसमध्ये चढलेल्या रामधर या सुतारालाही लुटल्याचा आरोप असून त्या प्रकरणी सुरू असलेली चौकशीही पूर्ण झाली आहे. या चौकशीदरम्यान न्याय मंडळाने पीडित युवतीचा मित्र आणि रामधर या सुताराची जबानीही नोंदवून घेतली आहे.
सदर बालगुन्हेगार आरोपीविरुद्ध कोणताही वैद्यकीय पुरावा मिळालेला नाही, त्याचप्रमाणे बसमध्ये त्याच्या बोटांचे ठसेही आढळले नाहीत, असा युक्तिवाद या आरोपीच्या वकिलांनी केला.