देशाला हादरा देणाऱ्या आणि बलात्काराच्या गुन्ह्य़ासाठी फाशीच दिली पाहिजे, असा देशव्यापी सूर उमटविणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही नराधमांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी शिक्कामोर्तब केले. हा निकाल राजकीय विचाराने प्रेरित असून त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका केली जाईल, असे आरोपींच्या वकिलांनी जाहीर केल्याने ‘त्या’ तरुणीला खरा न्याय मिळणे आणखी लांबणीवरच गेले आहे.
दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी धावत्या बसमध्ये चौघा नराधमांनी आणि एका अल्पवयीन मुलाने अमानुष बलात्कार केला होता तसेच तिला आणि तिच्या मित्राला लोखंडी सळ्यांनी मारहाण करून नंतर बसमधून फेकून दिले होते. २९ डिसेंबरला सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात या तरुणीचा मृत्यू झाला होता.
कनिष्ठ न्यायालयाने १३ सप्टेंबर २०१३ रोजी अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश या चौघांना फाशीची सजा ठोठावली होती. त्यानंतर या निकालावर अंतिम निर्णय घेण्यासाठी तो दिल्ली उच्च न्यायालयाकडे सोपविण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाचा निकाल व त्यावरील आरोपींची आव्हान याचिका या दोहोंची सुनावणी साडेतीन महिन्यात पूर्ण झाली. न्या. रीवा खेत्रपाल आणि न्या. प्रतिभा राणी यांनी या चौघांनी केलेला गुन्हा हा अत्यंत निर्घृण असल्याचे स्पष्ट करीत त्यांना फाशी देणेच योग्य असल्याचे नमूद केले. फाशी रद्द करावी, ही आरोपींची मागणी फेटाळत फाशीवर  शिक्कामोर्तब करीत आहोत, असे खंडपीठाने स्पष्ट केले.सुनावणीच्या वेळी मुलीचे पालकही उपस्थित होते. जेव्हा सर्व दोषींना फासावर लटकवले जाईल तेव्हाच आम्हाला पूर्ण न्याय मिळेल, असे मुलीच्या आईने  पत्रकारांना सांगितले.
घटनाक्रम
१६ डिसेंबर २०१२ : दिल्लीत धावत्या बसमध्ये सहा जणांकडून मुलीवर बलात्कार. तिला व तिच्या मित्राला अमानुष मारहाण करून नंतर बसमधून फेकले. दोघांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले गेले.
१७ डिसेंबर : देशभर संतापाचा उद्रेक. या निर्घृण कृत्यात बसचालक राम सिंग, त्याचा भाऊ मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ता असल्याचे उघड.
१८ डिसेंबर : राम सिंग आणि तिघांना अटक.
२१ डिसेंबर : बलात्कार आणि हत्येत अमानुषतेचे टोक गाठणाऱ्या अल्पवयीन मुलाला दिल्लीतील आनंद विहार बसस्थानकातून अटक. अक्षय ठाकूर या सहाव्या आरोपीच्या अटकेसाठी हरयाणा आणि बिहारमध्ये छापे.
२१, २२ डिसेंबर : बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्य़ात अक्षय ठाकूरला अटक.
२३ डिसेंबर : कारवाईतील संथगतीवरून देशभर निदर्शनांचा उद्रेक. निदर्शकांच्या कथित मारहाणीत पोलीस हवालदार सुभाष तोमार जखमी.
२५ डिसेंबर : ‘त्या’ मुलीची प्रकृती चिंताजनक. तोमार यांचा रुग्णालयात मृत्यू.
२६ डिसेंबर : मुलीला सिंगापूरमध्ये उपचारासाठी नेले.
२९ डिसेंबर : मुलीचा पहाटे सव्वा दोन वाजता मृत्यू. आरोपींविरोधात हत्येचा गुन्हाही दाखल.
२ जानेवारी २०१३ : बलात्कार खटल्यांचा वेगाने निकाल लावण्यासाठी जलदगती न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश अल्तमास कबीर यांच्या हस्ते उद्घाटन.
३ जानेवारी : पाच आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल.
७ जानेवारी : खटल्याची इनकॅमेरा सुनावणी सुरू.
२ फेब्रुवारी : पाच आरोपींविरोधात आरोपपत्र.
२८ फेब्रुवारी : बालगुन्हेगार लवादात सहाव्या आरोपीविरुद्ध आरोपपत्र.
११ मार्च : आरोपी राम सिंग याची तिहार तुरुंगात आत्महत्या.
३१ ऑगस्ट : बालगुन्हेगार लवादाकडून अल्पवयीन आरोपीस तीन वर्षांचा सुधारगृहात राहण्याची शिक्षा.
१३ सप्टेंबर : चौघाही नराधमांना फाशीची शिक्षा जाहीर.