दिल्लीत २०१२ साली सामूहिक बलात्काराचा बळी ठरलेल्या ‘निर्भया’ व तिच्या मित्रानेच अमानुषता दाखवल्याचा खळबळजनक दावा प्रकरणात शिक्षा झालेल्या एका गुन्हेगाराने केला आहे. निर्भया व तिचा मित्र यांनी विरोध केला नसता, तर आमच्या टोळीने अमानुष मारहाण करून तिला ठार केले नसते, असे मुकेश सिंह या आरोपीने तिहार तुरुंगातून बीबीसीच्या एका वृत्तपटासाठी दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ही घटना म्हणजे ‘अपघात’ असल्याचे सांगून तो म्हणाला की, ज्या वेळी तिच्यावर अत्याचार होत होता तेव्हा तिने विरोध करायला नको होता. तिने फक्त शांत राहून बलात्कार होऊ द्यायला हवा होता. तसे झाले असते तर आम्ही आमचे ‘काम आटोपल्यानंतर’ तिला जाऊ दिले असते आणि फक्त तिच्या मित्राला मारहाण केली असती.
१६ डिसेंबर २०१२च्या ‘त्या’ दुर्दैवी रात्री निर्भया व तिचा मित्र चित्रपट पाहून घरी येत होते. ते बसमध्ये बसले असता बसचालकासह सहाजणांनी तिच्यावर अमानुष अत्याचार केला आणि तिच्या मित्राला जबर मारहाण केली. या घटनेबाबत देशभरात जनक्षोभ उसळला होता. अल्पवयीन आरोपीला बलात्कार व खुनासाठीची कमाल तीन वर्षांची शिक्षा देण्यात आली. १० सप्टेंबर २०१३ रोजी न्यायालयाने इतर चार आरोपींना बलात्कार व खुनाच्या गुन्ह्य़ासाठी दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिली. ही शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने कायम केली आहे.