स्वतंत्र तेलंगणच्या प्रश्नावर केंद्राचा बहुप्रतीक्षित निर्णय येत्या महिन्याभरात घेण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी येथे केली़
या प्रश्नावर आंध्र प्रदेशातील आठही प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक शुक्रवारी बोलावण्यात आली होती़  या बैठकीत आपण सर्व प्रतिनिधींचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकले आह़े  शासनाला या बैठकीत चर्चिलेल्या बाबींची माहिती देण्यात येईल़  त्यानंतर महिन्याभरात आमचा यावरील निर्णय होईल, असे शिंदे यांनी सांगितल़े  तसेच याबाबतचा निर्णय शक्य तितक्या तातडीने व्हावा, असे सर्वच प्रतिनिधींनी सुचविल्याचेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीत काँग्रेस, भाजप, तेलंगणा राष्ट्र समिती, कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, तेलुगु देशम पार्टी, ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादुल मुस्लिमीन आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांनी भाग घेतला होता़  स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी अग्रेसर असणाऱ्या तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी मात्र ही गृहमंत्र्यांनी बोलावलेली ही बैठक निर्थक असल्याचे म्हटले आह़े  तसेच त्यांनी स्वतंत्र तेलंगणाबाबतच्या शासनाच्या दृष्टिकोनाचा निषेध करण्यासाठी शनिवारी तेलंगण बंदची हाक दिली आह़े  तेलंगणा प्रश्नाबाबत महिनाभरात निर्णय घेण्याच्या केंद्राच्या निर्णयाबाबत आपण समाधानी नसल्याचे राव यांनी सांगितल़े
तेलंगणवासीयांपुढील गेल्या अनेक वर्षांपासूनच्या समस्या जाणून घेतल्या असून, त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याचे आंदोलकांनी शांतता पाळावी, असे आवाहन या वेळी शिंदे यांनी केल़े  तसेच तेलंगणप्रश्नी घेण्यात आलेली ही शेवटची सर्वपक्षीय बैठक असून आपण या बैठकीबाबत पूर्ण समाधानी आहोत, असेही शिंदे या वेळी म्हणाल़े