उत्तर प्रदेशात बिहारप्रमाणे आघाडी होऊ शकते, अशी शक्यता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी व्यक्त केली. मात्र कट्टर प्रतिस्पर्धी बसपासह आघाडी स्थापन करण्याबाबतचा अंतिम निर्णय सपाचे नेते मुलायमसिंह यादव हेच घेतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यात महाआघाडी स्थापन होऊ शकते, असे वक्तव्य अखिलेश यांनी रविवारी संत कबीरनगर येथे केले होते त्याबद्दल वार्ताहरांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तेव्हा मुलायमसिंह या बाबत निर्णय घेतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाआघाडीत मायावती यांचा बसपा असेल का, असे विचारले असता अखिलेश म्हणाले की, आघाडीबाबतचा कोणताही निर्णय सपाचे राष्ट्रीय संसदीय मंडळ आणि मुलायमसिंह यादव हे घेतील.
बिहारमध्ये महाआघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अनेक नेत्यांनी भाजपविरोधी घटकांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.