पाटणा : लोकजनशक्ती पार्टी (एलजेपी) रालोआमध्ये कायम राहील का, याबाबतचा निर्णय केवळ भाजपच घेऊ शकतो, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.

लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नितीशकुमार यांच्या जदयूला बिहार विधानसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसला आहे.

रालोआतील घटक पक्षांची शुक्रवारी औपचारिक बैठक होणार असून त्यावेळी शपथविधीची तारीख ठरविण्यात येईल, असेही नितीशकुमार यांनी रालोआच्या विजयानंतर प्रथमच पत्रकारांना सांगितले.

केंद्रातील रालोआमधून भाजपला वगळावे असे आपण भाजपला सांगणार का असे विचारले असता नितीशकुमार यांनी, तुम्हीच तशी सूचना करा, असे हसत हसत पत्रकारांना सांगितले. मात्र याबाबतचा निर्णय भाजप घेईल, आपल्याला त्या संदर्भात काहीही बोलावयाचे नाही, असे त्यानंतर नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.

पूर्वीप्रमाणेच आपण मुक्त कारभार करू शकाल का, या प्रश्नाला नितीशकुमार यांनी नकारार्थी उत्तर दिले. गुन्हा, भ्रष्टाचार आणि जातीयवाद याबाबत आपण कधीही तडजोड केली नाही आणि त्यामध्ये बदलही होणार नाही, आपण कारभार हाती घेतल्यापासून एकही दंगल झाली नाही, असे ते म्हणाले.