कांद्याचे गगनाला भिडलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने एक लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय शनिवारी घेतला. दिल्लीसह अनेक ठिकाणी कांद्याचे भाव १०० रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत.
इतर देशांतून पुरेसा कांदा आयात करण्यात येणार असल्याचे गेल्या आठवडय़ात सरकारने स्पष्ट केले होते. ‘एमएमटीसी’ या सरकारी मालकीच्या व्यापार संस्थेद्वारे परदेशातून कांदा आयात करण्यात येणार असून नाफेडमार्फत त्याचा देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा केला जाणार आहे. सचिव समितीच्या बैठकीत शनिवारी हा निर्णय घेण्यात आला. किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने एक लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी केले.
होणार काय? कांदा ‘एमएमटीसी’ आयात करेल. त्यानंतर तो १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत देशांतर्गत बाजारपेठेत वितरणासाठी उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. नाफेडला आयात केलेल्या कांद्याचा देशभरात पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 10, 2019 1:18 am