स्वतंत्र तेलंगणा प्रश्नावर महिनाभरात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज (शुक्रवार) दिली.
आजची बैठक अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली. काही प्रतिनिधी म्हणाले की जितक्या लवकर निर्णय घेता येईल तितक्या वलकर घेण्यात यावा
आणि काही म्हणाले की साधारण महिन्याभरात निर्णय घेण्यात यावा, अशी माहिती सुशिलकुमार शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रसारमाध्यामांना दिली.
शिंदे म्हणाले, त्यांना पूर्ण विश्वास आहे की आंध्र प्रदेशाच्या जनतेला सामोरं जाव्या लागणा-या समस्यांवर लवकरात लवकर उपाय निघेल.
दरम्यान, आजच्या बैठकीतून काहीही निष्कर्ष काढता येणार नाही परंतू ही बैठक फक्त माहिती काढून घेण्यासाठी होती असं आजच्या बैठकीला उपस्थित असणा-या आंध्र प्रदेशच्या काही स्थानिक पक्षांचे म्हणणे आहे.
टीआरएसचे प्रमुख के.चंद्रशेखर राव हे आजच्या केंद्राच्या बैठकीबाबत नाराज दिसले आणि त्यांनी शनिवारी बंदचे आवाहन केले आहे.
गेल्या चार दशकांपासून तेलंगणाची मागणी जोर धरत आहे. कॉंग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या सरकारने या निर्णयाला तत्वत: मान्यता दिल्यानंतर आंध्र प्रदेशातील आर्थिकदृष्ट्या मागास भाग वेगळा करण्याची मागणी जोर धरत आहे.
आत्तापर्यंत कॉंग्रेस, तेलगू देसम पक्ष(टीडीपी), तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस), प्रजा राज्यम पक्ष आणि स्वतंत्र कायदेतज्ञांनी स्वतंत्र तेलंगणाची जोरदार मागणी करत संसद आणि आंध्र राज्य विधानसभेतून राजीनामा दिला आहे.
तेलंगणा भागात १० आंध्र प्रदेशचे जिल्हे:  हैदराबाद, अदिलाबाद, खम्माम, करीमनगर, महबूबनगर, मेदक, नालगोंडा, निझामाबाद, रंगारेड्डी आणि वारांगल यांचा समावेळ होतो. मुसी नदी, कृष्णा आणि गोदावरी नदी याच भागातून पश्चिमेकडून उत्तरेकडे वाहतात.
आधीही स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी १९६९, १९७२ आणि २००० साली मोठ्या चळवळी झाल्या आहेत. २००९ पासून ही मागणी पुन्हा जोर धरू लागली असून त्याचा राज्याच्या राजकारवर मोठा परिणाम होत आहे.