जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या कठीण वाटत असला तरी या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील लोकांमध्ये विकासाची नवी आशा जागृत झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दिल्लीत एका परिषदेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले, “यापूर्वी निवडणुका आल्या की नव्या रेल्वे गाड्या सोडण्याच्या तसेच शेतकऱ्यांच्या मदतीच्या घोषणा केल्या जात होत्या. मात्र, आता आम्ही लोकांना आश्वासनांच्या राजकारणाकडून प्रत्यक्ष कामांच्या राजकारणाकडे घेऊन चाललो आहोत. यापूर्वी संसदेत अनेक नव्या रेल्वे गाड्यांच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, एकही सुरु झाली नाही. त्या रेल्वे गाड्यांचा कागदावर कोणताही उल्लेख नाही. आम्ही केवळ घोषणाबाजी करणारे नाही तर नवा अध्याय लिहिणारे लोक आहोत. आम्ही देशाचे सामर्थ्य, साधन-संपत्ती आणि देशाच्या स्वप्नांवर भरवसा करणारे लोक आहोत.”

भारत संपूर्ण विश्वासाने आपल्या अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी काम करीत आहे. हे लक्ष्य अर्थव्यवस्थेसोबत १,३०९ कोटी भारतीयांचे दरडोई उत्पन्न, राहणीमानाचा दर्जा आणि त्यांच्या चांगल्या भविष्याशी जोडले गेलेले आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

नागरिकता दुरुस्ती विधेयकावर भाष्य करताना मोदी म्हणाले, “आपल्या देशात आणि परदेशातील भारतीयांवर अन्याय होत असेल तर त्यांना भारतीय नागरिकता बहाल केल्याने त्यांचे भविष्य चांगले होईल. परदेशातून आलेली शेकडो कुटुंबे ज्यांना भारताबाबत आस्था होती त्यांना जर भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग खुला झाला तर त्यांचे भविष्यही चांगले होईल. दरम्यान, केंद्रीय मंत्रीमंडळाने बुधवारी या नागरिकता दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे.