मुलींचे लग्नाचे योग्य वय ठरवण्याचा निर्णय यासंबंधीचा समितीचा अहवाल आल्यानंतर लगेचच घेतला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत देशभर चर्चा केली जात आहे. अनेक मुलींनी मला पत्र पाठवून समितीच्या अहवालाबाबत विचारणा केली आहे. ही समिती अद्याप अहवाल का सादर करत नाही, असेही त्यांनी विचारले आहे. सरकारकडे अहवाल सादर झाला की तातडीने मुलींच्या लग्नाच्या वयासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे मोदी यांनी सांगितले.

‘फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन’च्या ७५व्या स्थापनादिनानिमित्त पंतप्रधानांनी ७५ रुपयांचे नाणे प्रकाशित केले. त्यानिमित्त ते बोलत होते.  मुलींचे लग्नाचे किमान वय आणि मातृत्वाचा परस्परसंबंध या अनुषंगाने केंद्र सरकारने कृती गट स्थापन केल्याची माहिती २२ सप्टेंबर रोजी दिली होती. त्याआधी स्वांतत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून केलेल्या भाषणात मोदींनी मुलींच्या लग्नाच्या वयाचा उल्लेख केला होता. सध्या मुलींच्या लग्नाचे वय १८ तर, मुलांसाठी किमान २१ वर्षांची अट आहे.

११ कोटी स्वच्छतागृहे

पंतप्रधान मोदी यांनी कुपोषणाच्या समस्येचाही भाषणात उल्लेख केला. कुषोषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोहीम राबवली जात आहे. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ११ कोटी स्वच्छतागृहे बांधली आहेत. गरीब महिलांना एक रुपयांत ‘सॅनिटरी पॅड्स’ पुरवली जात आहेत, असेही मोदी यांनी सांगितले.

हमीभावाची योजना कायम – मोदी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांना होणाऱ्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा, ‘‘किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देण्यास केंद्र सरकार वचनबद्ध आहे’’, असे स्पष्ट केले.

महिलांचे शिक्षण आणि आरोग्य या प्रमुख मुद्दय़ांवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. मुलांपेक्षा मुलींचे शाळेत जाण्याचे प्रमाण प्रथमच अधिक असल्याचे आढळले आहे. शिक्षणातील मुलींचा सहभाग वाढावा यासाठी केंद्र सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत, त्याचेच हे फलित आहे.  – नरेंद्र मोदी, पंतप्रधान