अध्यक्ष जो बायडेन यांचा दावा

अफगाणिस्तानातील वीस वर्षांच्या संघर्षानंतर अमेरिकी सैन्य माघारी घेण्याचा निर्णय योग्यच असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. हा निर्णय अमेरिकी जनतेच्या हिताचा आहे, अशा शब्दात त्यांनी समर्थन केले.

व्हाइट हाऊसमधून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात बायडेन यांनी सांगितले, की अफगाणिस्तानातील युद्धात आणखी काळ सहभागी होण्यात अर्थ उरला नव्हता. देशातील लोकांच्या हितासाठी सैन्याची माघारी योग्यच होती. अफगाणिस्तानातील युद्ध आता संपले आहे. अतिशय शहाणपणाचा व जनतेसाठी उत्तम असा हा निर्णय आहे असे त्यांनी स्पष्ट केले. बायडेन यांनी ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्याच्या स्मृती दिनाच्या ११ दिवस आधी देशाला उद्देशून भाषण केले. दहशतवादी हल्ले झाल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात हस्तक्षेप केला होता. त्यानंतर तालिबानला अफगाणिस्तानातील सत्तेवरून अमेरिकेने हाकलून लावले होते. आता पुन्हा तालिबानचे राज्य आले आहे.

बायडेन यांनी सांगितले, की संघर्ष वाढवणे किंवा सैन्य माघारी घेणे असे दोन पर्याय आपल्या पुढे होते त्यात आपण सैन्य माघारीचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानात जी उद्दिष्टे साध्य करायची होती ती आम्ही साध्य केली होती. ती दशकाभरापूर्वीच साध्य झालेली असताना आणखी दहा वर्षे अमेरिकी सैन्य तेथे होते. त्यामुळे तेथील युद्ध संपवणे गरजेचे होते. हा निर्णय केवळ अफगाणिस्तानपुरता नव्हता. इतर देशातील लष्करी मोहिमा संपवण्याचाही त्याचा हेतू होता. आतापर्यंत अफगाणिस्तानातून १ लाख २० हजार लोकांना माघारी आणण्यात आले असून लोकांना अमेरिकेत सुरक्षितपणे आणण्यात यश आले आहे. बायडेन यांनी ज्या पद्धतीने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतले त्यावर जगभरातून टीका झाली होती. सैन्य माघारीचे आश्वासन आपण येथील जनतेला दिले होते ते पूर्ण झाले आहे. अफगाणिस्तानातील युद्धावर २ लाख कोटी डॉलर्स खर्च झाले असल्याचे ‘ब्राऊन’ विद्यापीठाच्या अंदाजात म्हटले असून गेल्या वीस वर्षात अफगाणिस्तानात दिवसाला ३० कोटी डॉलर्स खर्च झाला आहे.

दुसऱ्या कुठल्याही संघर्षात न पडता आयसिससह सर्व दहशतवादी गटांपासून देशाचे रक्षण करण्यात येईल, असे आश्वासन बायडेन यांनी दिले.