ह्य़ुस्टनमधील या मेळाव्याचे ‘हाउडी मोदी’ हे नाव आहे. पण मोदी एकटा कोणी नाही. १३० कोटी भारतीयांच्या आदेशावर काम करणारा मी साधारण व्यक्ती आहे. यंदा भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१ कोटी जनतेने ऐतिहासिक कौल दिला. या निवडणुकीने भारतीय लोकशाहीची ताकद जगभर दाखवून दिली. ६१ कोटी मतदारांनी जगाला संदेश दिला, की भारतात सारे काही छान चालले आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित ५० हजार अनिवासी भारतीय आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर विश्वास व्यक्त केला.

त्याचबरोबर, दहशतवादाविरोधात आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे. या लढाईत अध्यक्ष ट्रम्प दहशतवादाविरोधात उभे आहेत, असे मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सांगितले. ज्यांना स्वतचा देश सांभाळता येत नाही, अशा मंडळींनी भारतद्वेषाला केंद्रस्थानी ठेवले. दहशतवादाचे समर्थन देणाऱ्यांना सारे जग ओळखून आहे.  ९/११ किंवा २६/११ चे सूत्रधार कोठे सापडतात, या त्यांच्या विधानाला मोठी दाद मिळाली.

मोदी आणि ट्रम्प यांनी परस्परस्तुती करून आणि भारत-अमेरिका मैत्रीचा विविधांगी आढावा घेतानाच, इस्लामी दहशतवादाविरोधात लढा तीव्र करण्याचे आश्वासनही स्वतंत्र भाषणांमध्ये दिले. ही सभा अनेक अर्थानी एतिहासिक ठरली. कारण यानित्तिाने प्रथमच अमेरिकी अध्यक्ष आणि भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेमध्ये एखाद्या सभेला संबोधित केले.

कल्याणकारी राज्याचा ध्यास घेतल्यामुळे ईझ ऑफ डुइंग बिझनेसप्रमाणेच ईझ ऑफ लिव्हिंगला आम्ही प्राधान्य दिले. यातून गेल्या पाच वर्षांत ग्रामीण भागांतील लोकांचे राहणीमान आम्ही वर आणले. पण ‘वेल्फेयर’प्रमाणेच आमच्या सरकारने अनेक गोष्टींना ‘फेयरवेल’ देण्याचे ठरवले आहे. यातूनच अनुच्छेद ३७० आम्ही तिलांजली दिली. या कलमामुळे जम्मू-काश्मीरमधील जनता कायम विकासापासून वंचित राहात होती. या राज्याती नागरिकांना इतर राज्यांप्रमाणे अधिकार नव्हते. गरिबी आणि बेरोजगारी वाढल्यामुळे विभाजनवाद्यांचे फावले होते. या अन्याय्य व्यवस्थेचे प्रतीक असलेल्या अनुच्छेद ३७०चे उच्चाटन संसदेच्या दोन्ही सभागृहांनी दोन तृतियांश बहुमताने केले, हे मोदी यांनी नमूद करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

भाषणाच्या सुरुवातीला ट्रम्प यांचा उल्लेख त्यांनी भारतमित्र असा केला. व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी होणे हा दोन देशांतील संबंधांचा आणि आमच्यातील मैत्रीचा परिपाक आहे. अबकी बार ट्रम्प सरकार असेही मोदी यांनी सांगून टाकले.

ट्रम्प यांनी मोदी यांचा उल्लेख महान नेते असा केला. ६१ कोटी मतदार ही खूप मोठी संख्या आहे. या जनतेने मोदी यांच्या कर्तृत्वावर विश्वास टाकला. अमेरिकेतील भारतीयांनी या देशाला समृद्ध केले. येथे आलेले ५० हजार नागरिक या समृद्धीचे आणि भारत-अमेरिका मैत्रीचे प्रतीक आहे. भारताची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे. त्याचबरोबर, इस्लामी मूलतत्त्ववादाविरोधात आमचा लढा भारताच्या बरोबरीने सुरू राहील, असे ट्रम्प यांनी सांगितले.

ह्य़ुस्टनचे महापौर सिल्वेस्टर टर्नर यांनी ह्य़ुस्टन-भारत प्रेमाचे प्रतीक म्हणून शहराची प्रतीकात्मक चावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्त केली. प्रतिनिधिगृहातील डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते स्टेनी होयर यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील समान मूल्यांचा आणि भारतीय-अमेरिकी नागरिकांच्या कर्तृत्वाचा, योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. या कार्यक्रमाला रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट अशा दोन्ही पक्षांचे सिनेटर, प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमाच्या आधी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. मॅडिसन स्क्वेअर किंवा सान होजेपेक्षाही ह्य़ुस्टनमधील कार्यक्रम अधिक भव्य आणि परिणामकारक झाला.

भारतात सारे काही छान आहे.. भारतात सारे काही छान आहे, हे मोदी यांनी मराठीसह विविध भाषांमध्ये बोलून दाखवले. भारतातील भाषा ही भारतीय लोकशाहीची, उदारमतवादाची ओळख आहे. विविध पंथ, संप्रदाय, पूजापद्धती, विविध वेशभूषा, ऋतुचक्र ही विविधता आणि या विविधतेतील एकता हीच आमची ओळख. हीच प्रेरणा. वैविध्य आणि लोकशाहीचे संस्कार बरोबर घेऊन जातो. याच परंपरेचे हे प्रतीक आहेत, असे मोदी म्हणाले.