मुंबईत दादर येथील इंदू गिरणीच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून (एनटीसी) लवकरच ही जमीन राज्य शासनाच्या ताब्यात येणार असून या संदर्भातील करारावर रविवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घुमान येथे केली.
या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली असून एनटीसीला किती मोबदला द्यायचा ते ठरविणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एनटीसीच्या प्रतिनिधींमध्ये करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राज्य शासन  एनटीसीला मोबदला देणार असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, केंद्राच्या मान्यतेने एनटीसी जागा थेट राज्य शासनाला देता येऊ शकते, असा निर्वाळा देशाच्या अ‍ॅटर्नी जनरलनी दिल्याने वेगळा कायदा करण्याची आवश्यकता नव्हती.