येथील कन्नूर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या इंडियन हिस्टरी काँग्रेसच्या (अखिल भारतीय इतिहास अधिवेशन) अधिवेशनात काही प्रतिनिधींनी राज्यपाल अरिफ महंमद खान यांच्या विरोधात अभूतपूर्व निदर्शने केली.

८० व्या इंडियन हिस्टरी काँग्रेसचे अधिवेशन येथे आयोजित करण्यात आले होते.

राज्यपालांनी या अधिवेशनाचे उद्घाटन केले. राज्यपाल अरिफ महंमद खान नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनांवर भाष्य करीत असताना  काही प्रतिनिधींनी त्यांना विरोध केला. त्यावर खान यांनी सांगितले की, ‘‘तुम्हाला निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही मला खाली बसवू शकत नाही.’’ नंतरही काही प्रतिनिधींनी निषेध सुरूच ठेवला. त्यावर खान म्हणाले की, ‘‘जेव्हा तुम्ही चर्चेची दारे बंद करता तेव्हा एक प्रकारे हिंसाचाराला उत्तेजन देत असता.’’ बाहेरच्या राज्यातील काही विद्यार्थ्यांनी या वेळी निषेध फलक दाखवून घोषणा दिल्या.

या घटनेवर चिंता व्यक्त करून हिस्टरी काँग्रेसच्या सचिवांनी सांगितले की, काही प्रतिनिधी शांततेने उभे होते. त्यांनी निषेध फलक दाखवले, त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. काही प्रतिनिधींनी ‘केरळ राज्यपाल शेम शेम’ अशा घोषणा दिल्या.

एका महिला प्रतिनिधीला पोलिसांनी जीपमध्ये घालून नेले, असे सांगण्यात आले.