आरटीआयच्या माध्यमातून प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यांना प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना विविध प्रकारे त्रास दिल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. यामध्ये बिहारमधील घटनेमुळे आणखी एक भर पडली आहे. येथील एका आरटीआय कार्यकर्त्याच्या अल्पवयीन मुलाला पाच महिने तुरुंगवास भोगावा लागला आहे. इंडियन एक्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

एक्प्रेसच्या वृत्तानुसार, बक्सर येथील एका आरटीआय कार्यकर्त्याच्या १४ वर्षीय मुलाची फेब्रुवारी महिन्यात तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. तेव्हापासून पाच महिने तो तुरुंगात होता. त्याला अटक करतेवेळी पोलिसांनी तो प्रौढ आणि सज्ञान असल्याची नोंद करीत त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता राज्याच्या बाल न्याय मंडळाने अल्पवयीन घोषीत करीत त्याला जामीनही मंजूर केला. शुक्रवारी त्याचा जामीन मंजूर झाला असून आज (सोमवारी) तो आपल्या घरी परतणार आहे.

दरम्यान, या घटनेमध्ये अल्पवयीन मुलाला प्रौढ घोषित करण्यात स्थानिक पोलीस जबाबदार आहेत का?, याचा शोध घेण्याचे आदेश बक्सरचे एसपी उपेंद्रनाथ वर्मा यांनी दिले होते. २९ फेब्रुवारी रोजी दहावीची परीक्षा देऊन हा मुलगा घरी परतत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

इंडियन एक्प्रेसशी बोलताना या मुलाच्या वडिलांनी सांगितले, “बऱ्याच काळानंतर आमचा मुलगा घरी परतणार आहे, हे आमच्यासाठी स्वप्नवत आहे. त्याला त्रास झाला कारण मी आरटीआय कार्यकर्ता आहे आणि माझे प्रश्न, विशेषत: मनरेगा जॉब कार्ड आणि गेल्या दहा वर्षात धान खरेदीबाबत विचारलेल्या प्रश्नांमुळे काही लोकांना त्रास होत आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे माझ्या मुलाचं शैक्षणिक वर्ष वाया गेलं आहे. त्याने दहावीचे पाच पेपर दिले होते त्यात त्याला ८३ टक्के गुण मिळाले आहेत. शेवटचा पेपर बाकी असतानाच त्याला पोलिसांनी अटक केली.”

“माझा मुलगा गावातल्या दोन व्यक्तींसोबत मोटरसायकलवरुन जात होता. त्यांना पोलिसांनी बक्सरच्या राजपूर भागात अडवलं. पोलिसांनी असा दावा केला की, माझ्या मुलाकडे त्यांना गावठी कट्टा आढळून आला. तर इतर दोन व्यक्तींकडे जिवंत काडतूस आढळून आली. मात्र, पोलिसांची ही कारवाई बनावट आहे. आरटीआयमार्फत माझ्या प्रश्न विचारण्यामुळे ज्यांना त्रास होत आहे त्यांनी ही कारवाई घडवून आणली असून मी मात्र आता त्यांचा बुरखा फाडणार आहे,” असं या मुलाचे वडील आणि आरटीआय कार्यकर्त्याने म्हटलं आहे.