माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली आहे. रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याची लक्षणं दिसल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रणव मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयाकडून प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. याआधी प्रणव मुखर्जी यांच्या मुलाने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली होती.

“प्रणव मुखर्जी यांच्यामध्ये फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याची लक्षणं दिसत असून प्रकृती बिघडली आहे. ते अद्यापही व्हेंटिलेटरवर असून तज्ञांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे,” अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे.

याआधी प्रणव मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती दिली होती. ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं.

१० ऑगस्ट रोजी प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यासोबतच त्यांची करोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. तेव्हापासून प्रणव मुखर्जी रुग्णालयात दाखल असून प्रकृतीत चढ उतार होत आहेत.