नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारप्रकरणी तिहार तुरुंगात अटकेत असलेला अभिनेता  दीप सिद्धू याला  शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता; पण दिल्ली पोलिसांच्या गुन्हे तपास विभागाने शनिवारी त्याला पुन्हा अटक केली. संरक्षित स्मारकाची नासधूस केल्याच्या आरोपाखाली त्याला पुन्हा अटक झाली असून याप्रकरणी पुरातत्त्व विभागाने तक्रार दाखल केली होती.

विशेष न्यायाधीश निलोफर अबिदा परवीन यांनी शुक्रवारी त्याची तीस हजार रुपयांचे व्यक्तिगत बंधपत्र व तेवढ्याच रकमेची दोन हमीपत्रे याच्या आधारे सुटका करण्याचे आदेश  दिले होते. सिद्धू याला ९ फेब्रुवारी रोजी लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली होती. केंद्र सरकारने जारी केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी मोर्चा लाल किल्ल्यावर वळवून तेथे हिंसाचार करण्यात आला होता. त्यात सिद्धू याला अटक करण्यात आली होती.  न्यायालयाने सांगितले की,   पोलिसांनी सिद्धू याच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी त्याची पुन्हा कोठडी मागितली आहे, ती अयोग्य आहे. हा खटला   चित्रीकरण व समाजमाध्यमावरील ध्वनिचित्रफितींवर आधारित आहे.  त्या पुराव्यांमध्ये आरोपी हस्तक्षेप करण्याची शक्यता नाही.