दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी भरघोस यश पदरात टाकल्यानंतर आता आम आदमी पार्टीमध्ये (आप) मोठय़ा प्रमाणावर अंतर्गत धुसफुस सुरू झाली असून त्यामुळे पक्षप्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व्यथित झाले आहेत. पक्षांत सुरू असलेला संघर्ष किळसवाणा असून त्यामुळे आपल्याला वेदना होत आहेत आणि ही जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाशी केलेली प्रतारणा आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
या किळसवाण्या संघर्षांत पडण्याची आपली इच्छा नाही, आपल्याला दिल्लीतील कारभारावर लक्ष केंद्रित करावयाचे आहे. या प्रकारांमुळे आपल्याला वेदना होत आहेत आणि दिल्लीकरांशी प्रतारणा केल्यासारखे वाटत आहे, त्यामुळे कोणत्याही स्थितीत जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. ‘आप’चे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांना पक्षाच्या निमंत्रकपदावरून हटविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर ‘आप’मधील मतभेद चव्हाटय़ावर आले. त्यामुळे सर्व प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी बुधवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे.
अरविंद केजरीवाल अनुपस्थित राहण्याची शक्यता
आम आदमी पार्टीत (आप) बंडाचा झेंडा फडकाविल्याचा आरोप असलेले ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या भवितव्याचा फैसला बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत होणार असला तरी या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त आहे.प्रकृती अस्वास्थ्यामुळे केजरीवाल सदर बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. आता गुरुवारऐवजी केजरीवाल बुधवारी सायंकाळीच निसर्गोपचारासाठी बंगळुरूला रवाना होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

‘आप’मध्ये कलह, केजरीवाल गटाकडून योगेंद्र यादव लक्ष्य
दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांना लक्ष्य करण्यासाठी गेल्यावर्षी रेकॉर्ड करण्यात आलेले दूरध्वनी संभाषण सध्या प्रसारित करण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पक्षाच्या निमंत्रक पदावरून हटविण्यासाठी योगेंद्र यादव यांनी मोर्चेबांधणी केल्याचे चित्र असताना त्याविरोधात केजरीवाल यांच्याकडून हे संभाषण प्रसारित करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.