केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना दिल्ली हायकोर्टाने बुधवारी दिलासा दिला. निरुपम यांनी इराणींविरोधात दाखल केलेली अब्रुनुकसानीची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. या निर्णयासाठी स्मृती इराणींनी दिल्ली हायकोर्टाचे आभार मानले असून माझा लढा सुरूच राहणार, असेही त्यांनी म्हटले आहे.

२०१२ मधील गुजरात विधानसभांच्या निकालावेळी स्मृती इराणी यांनी वृत्तवाहिनीवरील एका वादविवाद कार्यक्रमात बदनामीकारक आणि अश्लाघ्य विधान केल्याचे म्हणत संजय निरुपम यांनी इराणी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. निरुपम यांच्या चारित्र्यावर टीका करून वैयक्तीक बदनामी केली आणि इराणी यांच्या वक्तव्यामुळे निरुपम यांच्या समाजप्रतिमेला धक्का पोहोचला असल्याचा आरोप निरुपम यांच्या वकिलांनी केला होता. या प्रकरणी कोर्टाने इराणींना समन्सही बजावले होते.

दिल्ली हायकोर्टात या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. स्मृती इराणींनी समन्स रद्द करण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने समन्स रद्द करतानाच निरुपम यांनी अब्रुनुकसानीप्रकरणी दाखल केलेली याचिकाही फेटाळून लावली आहे. त्यामुळे सहा वर्षांपासून सुरु असलेला हा खटला आता निकाली निघाला आहे.

हायकोर्टाच्या निर्णयानंतर स्मृती इराणींनी ट्विट करुन दिल्ली हायकोर्टाचे आभार मानले आहेत. ‘दिल्ली हायकोर्टाचे मी आभार मानते. कठीण काळात साथ देणारे माझे कुटुंबीय आणि माझी लीगल टीम यांच्यामुळेच मी आव्हानांना सामोरे जाऊ शकले. माझा लढा असाच सुरु राहणार, असे त्यांनी सांगितले.