पंतप्रधान नरेंद्र मोदींना विंचू म्हटल्या प्रकरणी काँग्रेस नेते शशी थरुर आता कायदेशीरदृष्टया अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या विरोधात न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील भाजपा नेते राजीव बब्बर यांनी हा खटला दाखल करताना थरुर यांच्या विधानाने आपल्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत असे याचिकेमध्ये म्हटले आहे.

आपल्याविरोधात दाखल झालेला हा खटला थिल्लरपणा असून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. लोकांचा अधिकार दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर लोकशाहीचे काय होणार? अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेले ? असे प्रश्न थरुर यांनी विचारले आहेत. मागच्या आठवडयात बेंगळुरु लिट फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंडीवर बसलेल्या विंचवासारखे असल्याचे राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील एका खास सूत्राच्या हवाल्याने म्हटले होते.

मोदी हे पिंडीवरचे असे विंचू आहेत की, ज्याला तुम्ही आपल्या हाताने काढू शकत नाही किंवा चपलेने मारुही शकत नाही असे थरुर म्हणाले होते. शशी थरुर यांनी दूर्भावपूर्ण हेतूने हे विधान केले. त्यामुळे हिंदू देवतांचा फक्त अनादरच नाही तर अपमानही झालाय असे या याचिकेत म्हटले आहे.