देशातील जातीय शक्ती समाजात तेढ निर्माण करीत आहेत. त्यामुळे अशा शक्तींना निवडणुकीत पराभूत करण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंगळवारी व्यक्त केले. भाजप आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना उद्देशून पंतप्रधानांनी हे मत  व्यक्त केल्याचे बोलले जाते. विविध धर्म, भाषांचा समावेश असलेला भारत हा आधुनिक देश आहे. मात्र अनेकदा देशातील या विविधतेचा फायदा उठवत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही पंतप्रधानांनी केली. राजीव गांधी सद्भावना पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते. विख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांना पंतप्रधान आणि युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ते पुढे म्हणाले की, या जातीय शक्तींना दैनंदिन जीवनातच नव्हे तर निवडणुकीच्या मैदानातही रोखण्याची गरज असून त्याची जबाबदारी सर्व राजकीय पक्ष आणि समाजातील सर्व घटकांची आहे.