संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. जोधपूर येथील विमानतळावरून सुखोई-३० या लढाऊ विमानातून प्रवास करणाऱ्या त्या देशातील पहिल्या संरक्षणमंत्री ठरल्या आहेत. यापूर्वी २५ नोव्हेंबर २००९ मध्ये तिन्ही दलांच्या प्रमुख या नात्याने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पुण्यातून सुखाईतून प्रवास केला होता. सुखोई हे वायू दलातील सर्वोत्कृष्ट लढाऊ विमान मानले जाते.

काही दिवसांपूर्वीच सीतारामन यांनी गोवा येथे नौदलातील सर्वांत मोठी युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यची पाहणी केली होती. संरक्षण मंत्री झाल्यापासून सीतारामन यांचा सैन्यदलातील विविध कार्यप्रणाली आणि तयारीबाबत जाणून घेण्याकडे कल असल्याचे दिसून येते. सुखोईतून उड्डाण करण्यापूर्वी त्यांनी वायू दलाच्या जवानांबरोबर चर्चाही केली. यापूर्वी त्यांनी याच महिन्यात गोव्यातील भारतीय नौदलाच्या कॅम्पवर एक दिवस व्यतीत केला होता.