भारत व चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या लष्करी सिद्धतेचा आणि एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी साठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आजपासून दोन दिवसीय दौऱ्यासाठी लडाखला पोहचले आहेत. या दरम्यान ते लडाख व जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यांच्याबरोबर संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे देखील आहेत. आज (शुक्रवार) हे सर्वजण लडाखचा दौरा करणार असून उद्या (शनिवार) जम्मू-काश्मीरला असणार आहेत.

संरक्षणमंत्री लडाख सेक्टरमध्ये ‘एलएसी’ व काश्मीरमध्ये ‘एलओसी’वरील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज सकाळी त्यांचे लेह विमानतळावर आगमन झाले.

या दौऱ्यावर निघण्या अगोदर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते की, मी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व त्या ठिकणी तैनात असलेल्या जवानांशी संवाद साधण्यासाठी जात आहे.

या अगोदर जुलै महिन्याच्या सुरुवातीस संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेह दौऱ्यासाठी रवाना होणार होते. मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द झाला होता. त्यानंतर ३ जुलै रोजी पंतप्रधान मोदी लेह जिल्ह्यातील नीमू येथे पोहचले होते. भारत व चीनच्या सैनिकांमध्ये ५ मे रोजी उफाळलेल्या संघर्षानंतर संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच लडाख दौरा आहे.

पूर्व लडाखमध्ये पूर्वस्थिती पुन्हा स्थापित केली जायलाच हवी; तसेच प्रत्यक्ष ताबा रेषेवर शांतता पुन्हा स्थापन करण्यासाठी दोन्ही बाजूंनी मान्य केलेल्या करारातील सर्व मुद्दय़ांचे तुम्हाला पालन करावेच लागेल, असा ‘अतिशय स्पष्ट’ संदेश भारतीय लष्कराने १५ तासांच्या चर्चेत चिनी लष्कराला दिला, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे.