हिंदुस्थानी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानातून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सकाळी बंगळुरू येथील हिन्दुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावरून उड्डाण केले. स्वदेशी तेजस लढाऊ विमानात बसणारे ते पहिले संरक्षणमंत्री आहेत. राजनाथ सिंह यांनी अर्धा तास विमानात घालवला. हिन्दुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड या भारतीय कंपनीने तेजसची निर्मिती केली आहे.

तेजस हे लढाऊ विमान असून, तीन वर्षापूर्वीच ते हवाई दलात दाखल झाले आहे. तेजस लवकरच अद्ययावत स्वरूपात येणार आहे. ८३ तेजस विमानांची निर्मिती हिन्दुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड करणार असून त्यासाठी ४५ हजार कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे.

“तेजस खुपच आरामदायी आहे. मी तेजसमधील सफरीचा आनंद घेतला. आता भारत जगभरात लढाऊ विमानांची निर्यात करू शकेल. त्या उंचीपर्यंत भारत पोहोचला आहे. याबद्दल मी हल (हिन्दुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड), डीआरडीओ आणि संबंधित संस्थांचे अभिनंदन करतो,” अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी तेजस उड्डाणानंतर व्यक्त केली.

तेजसची वैशिष्ट्ये-
तेजस हवेतून हवेत तसेच हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्राचा मारा करू शकते. यामध्ये बॉम्ब आणि रॉकेटही वापण्याची सुविधा आहे. ४२ टक्के कार्बन फायबर, ४३ टक्के अॅल्युमिनिअम आणि टायटेनियम या धातूपासून तेजची बांधणी करण्यात आलेली आहे. तेजसमध्ये केवळ एकच पायलट बसू शकतो. तर प्रशिक्षणासाठी असलेल्या तेजसमध्ये दोन सीटची सुविधा आहे. विशेष म्हणजे जमिनीपासून ५४ हजार उंचीपर्यंत तेजस उड्डाण करू शकते.