पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याच आठवडयात भारतीय आणि चिनी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. तब्बल १५ तास ही बैठक चालली. जे ठरलंय, त्याचं पालन करा असं भारतीय सैन्याकडून चीनला स्पष्ट करण्यात आलं आहे. सीमेवर शांतता आणि या प्रदेशात परिस्थिती सुधारण्याची जास्त जबाबदारी आता चीनवर आहे.

या भागातील तणाव अजूनही पूर्णपणे निवळलेला नाही. एकूणच या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सकाळीच लडाखमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बीपिन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे सुद्धा आहेत. पॅराशूट रेजिमेंच्या कमांडोजनी त्यांच्यासमोर पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर उतरण्याचे आपले कौशल्य सादर केले.

राजनाथ सिंह या दौऱ्यात अधिकारी आणि कमांडर्सकडून लडाखमधील सध्याची परिस्थिती समजून घेतील तसेच जवानांचे मनोबलही वाढवतील. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखचा दौरा करुन जवानांचे मनोबल उंचावले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, बीपिन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे हे लेहच्या स्ताकना भागामध्ये आहेत. भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडोजनी राजनाथ सिंह यांच्यासमोर आपले पॅरा जम्पिंगचे कौशल्य सादर केले. राजनाथ सिंह नियंत्रण रेषेजवळील भागांनाही भेट देणार आहेत.

तणाव पुन्हा वाढू शकतो
पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ पुन्हा एकदा भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये तणाव वाढू शकतो. सध्या दोन्ही देशाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पूर्व लडाखमध्ये एकूण चार ठिकाणी भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आले होते. त्यातल्या तीन ठिकाणी चिनी सैन्य माघारी फिरले आहे. पण पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राजवळील फिंगर ४ वरुन मागे हटण्यास चीनने नकार दिला आहे.

चीनच्या या हट्टी भूमिकेमुळे पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पेटू शकते. झी न्यूजने हे वृत्त दिले आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने कुठलीही आक्रमकता दाखवल्यास त्यांना लगेच प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने पूर्व लडाखच्या सीमेवर रणगाडयांची तैनाती वाढवली आहे. अजून धोका टळलेला नाही. भारतीय सैन्य पूर्णपणे हायअलर्टवर आहे.