संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी शनिवारी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची भेट घेतली. त्यावेळी सीतारमन यांनी अभिनंदन यांना खास संदेश दिला. तुम्ही जो दृढनिश्चय, शौर्य आणि धैर्य दाखवलेत त्याबद्दल संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे असे सीतारमन यांनी विंग कमांडर अभिनंदन यांना सांगितले. इंडियन एअर फोर्सच्या वैद्यकीय केंद्रात ही भेट झाली.

पाकिस्तानच्या ताब्यात असताना ६० तासांचा अनुभव कसा होता ते अभिनंदन यांनी सीतारमन यांना सांगितले. शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास अटारी-वाघा सीमेवरुन अभिनंदन वर्थमान भारतात दाखल झाले. रात्री पावणेबाराच्या सुमारास विशेष विमानाने ते दिल्लीत आले.
अभिनंदन सध्या दिल्लीमध्ये असून कुलिंग डाऊन प्रोसेस अंतर्गत एअर फोर्सच्या सेंट्रल मेडिकल केंद्रात त्यांच्यावर सध्या वेगवेगळया वैद्यकीय चाचण्या सुरु आहेत. शनिवारी सकाळी अभिनंदन त्यांच्या कुटुंबियांना भेटले. एअर फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांची भेट घेतली.

भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना आपण खूप चांगली वागणूक दिली असा पाकिस्तानकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी नाही. पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन वर्थमान यांचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला.