पेट्रोलियम मंत्रालयातील हेरगिरी प्रकरणात आता संरक्षण मंत्रालयातील एका रोजंदारी कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याने पेट्रोलियम मंत्रालय प्रकरणातील आरोपीला बनावट ओळखपत्र वापरण्यास दिले होते. मात्र संरक्षण खात्यातून कुठलीच संवेदनशील कागदपत्रे चोरली गेलेली नाहीत किंवा फुटलेली नाहीत. दरम्यान मुख्य महानगर दंडाधिकारी संजय खनगवाल यांनी आज अटक केलेल्या संरक्षण मंत्रालय कर्मचाऱ्याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली असून चार कंपनी अधिकाऱ्यांना ९ दिवसांची न्यायालयीने कोठडी दिली आहे.
आतापर्यंत या हेरगिरी प्रकरणात तेरा जणांना अटक करण्यात आली असून त्यातील एखाला काल कोळसा व उर्जा मंत्रालयातील संवेदनशील कागदपत्रे फोडल्याने अटक झाली होती. याप्रकरणी इतर सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, संरक्षण मंत्रालयात कामाला असलेला विरेंद्र कुमार हा रोजंदारी कर्मचारी होता व  त्याने लालता प्रसाद याला खोटे ओळखपत्र पुरवले होते व लेटरहेडवर खोटा कागदही छापून दिला होता. रामकुमार चौबे याने हीच कागदपत्रे वापरून वाहनाचा प्रवेश मिळवण्यासाठी वापरली. वाहन भारत सरकारचे आहे असे त्यात दाखवण्यात आले होते. या प्रकरणात संरक्षण मंत्रालयाची कुठलीही गोपनीय कागदपत्रे चोरीस गेलेली नाहीत. लालताप्रसाद व रामकुमार चौबे यांना १९ फेब्रुवारीस अटक करण्यात आली होती. विरेंद्र कुमार याला आज अटक करण्यात आली असून दिल्ली पोलिसांनी त्याच्या विरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे. पेट्रोलियम मंत्रालयातून कागदपत्रे पळवण्यात एका टोळीचा हात होता. दिल्ली पोलिसांनी गुरूवारी तेल मंत्रालयाच्या दोन कनिष्ठ अधिकाऱ्यांना व इतर तीन मध्यस्थांना वर्गीकृत कागदपत्रे चोरून ती उर्जा कंपन्यांना विकल्याच्या प्रकरणी अटक केली होती. शुक्रवारी उर्जा सल्लागार शंतनु सैकिया व प्रयास जैन तसेच उर्जा कंपन्यांच्या पाच जणांना अटक केली होती. त्यात शैलेश सक्सेना, विनयकुमार, के.के.नाईक, सुभाष चंद्र व ऋषी आनंद यांचा समावेश होता.