संरक्षण मंत्रालयातील सूत्रांकडून कारवाईचा तपशील उघड

‘उरीचा हल्ला म्हणजे उंटावरची काडी होती. तो झाल्यानंतर पंतप्रधानांनी मनोमन ठरवले होते, की बस्स, म्हणजे बस्स..! त्यामुळेच हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी घेतलेल्या बैठकीतच त्यांनी लष्कराला सीमापार घुसण्यासाठी हिरवा कंदील दाखवला होता. माध्यमांनी संयम बाळगला असता तर ही कारवाई कदाचित यापूर्वीच झाली असती..’

संरक्षण खात्यातील अत्यंत विश्वसनीय व्यक्ती माहिती देत होती. उरीचा जिव्हारी लागलेला हल्ला ते बुधवार मध्यरात्र व गुरुवारी पहाटे घेतलेला ‘बदला’ याचा अधिकृत तपशील, अर्थात अतिगोपनीय भाग वगळून, त्यांनी ‘लोकसत्ता’ कडे कथन केला. ही व्यक्ती पुढे म्हणाली, ‘आम्हाला युद्ध नको होते; पण पाकला जरब बसविण्यासारखी कारवाई करावयाची होती. निर्णय पक्का होता. भूमिका स्पष्ट होती. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी लष्कराला तत्वत: मान्यता दिली गेली. त्यानुसार लष्कर, गुप्तचर विभागाचे काम चालू झाले. चार ठिकाणच्या सात तळांवर आम्ही लक्ष केंद्रित केले. विश्वासार्ह माहिती मिळाल्यानंतर लगेचच लष्कराला सीमापार कारवाईसाठी राजकीय हिरवा कंदील दाखविण्यात आला. ही कारवाई मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सुरू झाली. सुमारे अडीचशे किमी परिसरात पसरलेल्या पाच सेक्टरमधील सात दहशतवादी तळांची अचूक माहिती लष्कराकडे होती. हे तळ नियंत्रण रेषेपासून ५०० मीटर ते तीन किमीच्या अंतरावर होते. कारवाईसाठी निवडण्यात आलेली वेळही अचूक होती. घनदाट अंधार. त्याचा अचूक फायदा घेण्यात आला’.

कमांडोंची विभागणी

विशेष प्रशिक्षण घेतलेल्या सुपर कंमाडोजची पाच पथकांमध्ये विभागणी करण्यात आली होती. या पथकांमध्ये सुसज्ज असलेले २५ कमांडो होते. भिंबर, हॉटस्प्रिंग, केल आणि लिपा या चार ठिकाणांजवळ हेलिकॉप्टरमधून पथके उतरली. ती उतरताना रडार आणि आवाजाचा खरा धोका होता, पण त्यावर कौशल्याने मात केली. त्यानंतर सुमारे चालत, सरपटत आणि रांगत जावे लागले. तिथे पोचल्यानंतर या कमांडोंनी सारे तळ उद्ध्वस्त करून टाकले.

जरा सबुरीनेच..

उरीनंतर पेटून लगेच हल्ला करता आला असता. लष्करही तयारीत होते. परंतु पाकिस्तान सावध होता. त्याचवेळी प्रसारमाध्यमांमध्ये अतिरंजित वार्ताकने येत होती. त्यामुळे आम्हाला थोडे थांबावे लागले, असे नमूद करून संरक्षण खात्यातील ही महत्त्वाची व्यक्ती पुढे म्हणाली, ‘थोडे थांबल्यानंतर आम्हाला तयारीसाठी वेळ मिळाला. पाकिस्तानला वाटत होते की आम्ही थंडावलो. ते थोडे बेसावधही राहिले. हल्ला करण्यापूर्वी आम्ही नियंत्रण रेषेवर अन्य काही ठिकाणी फैरी चालविल्या. ते जसे दहशतवाद्यांना घुसखोरी करू देण्यासाठी ‘कव्हर फायरिंग’ करतात, अगदी तसेच हे होते. लष्कराची कारवाई इतकी अचूक, दर्जेदार आणि वेगवान होती, की तिचा आवाका मोठा असतानाही आपली फारशी हानी झाली नाही. कामगिरी फत्ते करून कमांडोंचे पथक पहाटे साडेचारला तळावर परतलेही. पाकनेही प्रतिकार केला; पण तो खूप तोकडा होता. त्यानंतर डीजीएमओंनी पाकिस्तानच्या डीजीएमओंना कारवाईची माहिती दिली आणि मग केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीला सविस्तर माहिती दिल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली’.

पाकिस्तानची दातखीळ !

इस्लामाबाद : भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मिरात घुसत केलेल्या कारवाईने भांबावलेल्या, गडबडलेल्या पाकिस्तानला सुरुवातीला काय प्रतिक्रिया द्यावी हेच सुचत नव्हते. हळूहळू परिस्थितीचे आकलन झाल्यानंतर पाकिस्तानने पहिली प्रतिक्रिया दिली की, भारतीय लष्कराने अशी काही कारवाईच केलेली नाही. त्यानंतर त्यांची दुसरी प्रतिक्रिया होती की, सीमेपलीकडून भारताने गोळीबार केला आणि त्यालाच ते लक्ष्यभेद (सर्जिकल स्ट्राइक) असे गोंडस नाव देत प्रसारमाध्यमांना अतिरंजित वृत्त पुरवीत आहेत..

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर भारताने गुरुवारी सकाळी या कारवाईची माहिती पाकिस्तानला दिली. त्यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि सरकार यांची गडबडच उडाली. प्रथमत भारतीय लष्कराने अशी काही कारवाईच केली नाही, असे पाकिस्तानी लष्कराने पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सांगितले. मात्र, त्यानंतर आपल्याच वक्तव्यावरून घूमजाव करत भारतीय लष्कराने केवळ सीमेपलीकडून गोळीबार केला असल्याचा दावा केला. त्यानंतर पाकिस्तानी लष्करी सूत्रांनी भारत वस्तुस्थितीची मोडतोड करून कारवाईविषयीचे चित्र अतिरंजित करत असल्याचा कांगावा केला. परंतु दिवसअखेरीस पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी वस्तुस्थितीचा स्वीकार करत भारताच्या कृत्याचा निषेध करणारे वक्तव्य केले.

लष्करी सज्जतेचा आढावा

शरीफ यांनी पाकिस्तानी लष्कराच्या सज्जतेचा आढावाही घेतला. दिवसभर त्यांच्या कार्यालयात बैठकांचा जोर सुरू होता. लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी पंतप्रधानांना लष्करी सज्जतेची माहिती दिली. तसेच कोणत्याही परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी लष्कर तयार असल्याचा विश्वास दिला. भारताच्या कारवाईनंतर प्रथमत राहील शरीफ यांनी पंतप्रधानांना ‘भारताच्या दाव्यात काहीच तथ्य नाही’, असे सांगितले. मात्र, नंतर त्यांनी परिस्थिती मान्य केली. शरीफ यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासीर जांजुआ यांनीही एकंदर परिस्थितीचा आढावा घेत पंतप्रधानांना त्याची माहिती दिली.