पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप; अटल बोगद्याचे उद्घाटन

वृत्तसंस्था, रोहतांग (हिमाचल प्रदेश)

तत्कालीन काँग्रेस सरकारने देशाच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केले, अनेक प्रकल्प पूर्ण करण्याच्या बाबतीत चालढकल केली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला.

हिमाचल प्रदेशातील अटल बोगद्याचे उद्घाटन करताना मोदी बोलत होते. जगात असलेल्या महामार्गावरील बोगद्यांमध्ये हा बोगदा सर्वाधिक लांबीचा आहे. मोदी म्हणाले, ‘‘अटलबिहारी वाजपेयी यांनी या बोगद्याची पायाभरणी केली होती, पण त्यांचे सरकार गेल्यानंतर हा प्रकल्प नंतरचे सरकार विसरून गेले. केवळ राजकीय इच्छाशक्तीअभावी यापूर्वी काँग्रेस सरकारने काहीही केले नाही. त्यामुळे अनेक प्रकल्प रखडले. किंबहुना त्यांकडे दुर्लक्ष केले गेले.’’ देशाच्या संरक्षणाशिवाय अन्य कोणतीही गोष्ट महत्त्वाची असू शकत नाही. पंरतु काँग्रेसने संरक्षण हिताशी तडजोड केली, अशी टीकाही मोदी यांनी केली.

वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात हा बोगदा बांधण्यास सुरुवात झाली असती तरी त्याला पूर्ण करण्यास २०४० साल उजाडले असते, पण भाजप सरकारने कामाची गती वाढवून त्याचा प्रतिवर्ष ३०० मीटर बांधकाम हा वेग १४०० मीटरवर नेऊन हा प्रकल्प २०२० मध्येच पूर्ण केला आहे. ज्या कामाला एरवी २६ वर्षे लागली असती ते सहा वर्षांत पूर्ण केले गेले, असे मोदी यांनी म्हणाले. अटल बोगद्याप्रमाणेच अन्य प्रकल्पांच्या बाबतीत सरकार वेगाने काम करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोदी यांचे दावे

* नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी.

* काँग्रेसने कृषी सुधारणा राबवण्याचे धाडस दाखवले नाही.

* विरोधकांना शेतकऱ्यांना मागील शतकात न्यायचे आहे.

* काँग्रेसने निवडणुकीत याच कायद्यांचे आश्वासन दिले होते.

* नवे कामगार कायदे फायद्याचे, महिला-पुरुषांना समान वेतन समान संधी.

* सेवांचे डिजिटायझेशन आणि पैशांच्या थेट हस्तांतरामुळे भ्रष्टाचारात घट.