09 August 2020

News Flash

दिल्लीत अग्नितांडव

अनाज मंडी येथील कारखान्याच्या आगीत ४३ कामगारांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

उत्तर दिल्लीच्या अनाज मंडी भागातील बेकायदा कारखाने असलेल्या एका चार मजली इमारतीला रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ४३ कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इमारतीच्या मालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

दिल्लीत १९९७ मध्ये घडलेल्या उपहार चित्रपटगृह अग्नितांडवानंतरची ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. पोलीस आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे ५च्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आणि काही मिनिटांतच अग्निज्वाळांनी संपूर्ण इमारतीला कवेत घेतले. अनेक जण गंभीररीत्या होरपळल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. अग्निशमन दलाच्या १५० जवानांनी सुमारे पाच तास प्राणांची बाजी लावून आग विझवली.   बचावकार्य करताना अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) कमांडर आदित्य प्रताप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आगीमुळे कार्बन मोनॉक्साईड वायू पसरला. परिणामी अनेकांचा गुदमरून मृत्यू झाला. खिडक्यांचे गज कापून बचाव पथकांचे जवान आत घुसले आणि त्यांनी ६३ जणांना बाहेर काढले. त्यापैकी एका अल्पवयीन मुलासह ४३ जण मृतावस्थेत होते, तर १६ जण गंभीररीत्या होरपळले होते.

होरपळलेल्या अनेकांना राममनोहर लोहिया रुग्णालय, लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालय, हिंदुराव रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात ३४ मृतदेह आणण्यात आले असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक किशोर सिंग यांनी सांगितले. लेडी हार्डिग्ज रुग्णालयात ९ मृतदेह आणण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मृतांमध्ये स्थलांतरित कामगारांचा समावेश असून ते बिहार, उत्तर प्रदेशातील आहेत.

दिल्ली सरकारने या दुर्घटनेची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इमारतीसाठी अग्निशमन दलाकडून सुरक्षाविषयक परवाने घेण्यात आले नसल्याचे निष्पन्न झाले.  दरम्यान, या दुर्घटनेवरून भाजप आणि आम आदमी पक्ष यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत.

मृतांच्या नातलगांना १० लाख दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये भरपाई जाहीर केली आहे, तर जखमींना एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये मदत जाहीर केली आहे. भाजपने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली असून जखमींना २५ हजारांची मदत देण्यात येणार आहे.

नातलगांचा आक्रोश

हा कारखाना निवासी भागात आहे. आगीचे वृत्त पसरताच कारखान्यात काम करणाऱ्यांच्या नातलगांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांच्या आक्रोशामुळे तेथील वातावरण सुन्न करणारे होते.

इमारतीच्या मालकासह दोघे अटकेत

पोलिसांनी याप्रकरणी इमारतीचा एक मालक रेहान  आणि व्यवस्थापक फुरकान यांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे प्रकरण चौकशीसाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. इमारतीचा दुसरा मालक झुबेर आहे.

दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या दुर्घटनेची चौकशी जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिल्लीचे महसूलमंत्री कैलाश गेहलोत यांनी दिली.

११ जणांचे प्राण वाचवणारा नायक 

नवी दिल्ली : आगीची माहिती मिळताच दुर्घटनास्थळी प्रथम पोहोचणाऱ्यांमध्ये अग्निशमन दलाचे जवान राजेश शुक्ला यांचा समावेश होतो.  खिडक्या बंद असल्याने गज कापून ते आत शिरले. तेथे अंधार असताना प्रतिकूल स्थितीत शुक्ला यांनी मदतकार्य केले. त्यांनी मदतकार्य सुरू करून ११ जणांचे प्राण वाचवले. दिल्लीचे मंत्री आणि आपचे नेते सत्येंदर जैन यांनी शुक्ला यांच्या धाडसाचे कौतुक केले. शुक्ला आगीने वेढलेल्या इमारतीत प्रथम पोहोचले. त्यांनी ११ जणांना वाचवले. ते जखमी झाले, परंतु त्याही अवस्थेत त्यांनी कर्तव्यात कसूर केली नाही. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. तेच खरे नायक ठरले आहेत, असे जैन यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे. शुक्ला मदतकार्य करताना जखमी झाले आहेत.

‘मृत्यूच्या दाढेतून निसटलो’

या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील टोपी बनवण्याच्या कारखान्यात फिरोज खान (३२) काम करतात. ते या दुर्घटनेतून बचावले. ते म्हणाले, दुसऱ्या मजल्यावर आग लागली. मला जाग आली तेव्हा आमच्या खोलीला आगीच्या ज्वाळांनी वेढले होते. मी कामगारांना जागे केले. आम्ही दरवाजाजवळ झोपलेल्या चार-पाच जणांनी बाहेर धाव घेतली, पण दरवाजापासून दूर झोपलेल्या अनेक कामगारांचे काय झाले ते मला सांगता येणार नाही.

अनाज मंडी भागात लागलेली आग भीषण असून मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2019 12:51 am

Web Title: delhi 43 workers die in factory fire abn 97
Next Stories
1 नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत
2 पंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक
3 भादंवि, फौजदारी दंडसंहितेत बदलाचे गृहमंत्र्यांचे संकेत
Just Now!
X