दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीचे एकूण ८१० उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.या निवडणुकीसाठी एकूण ९०० उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले होते, मात्र ९० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात ८१० उमेदवार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विजय देव यांनी सांगितले. बुरारी मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे २३ उमेदवार रिंगणात असून त्यापाठोपाठ १९ उमेदवार मातिया महल आणि मातियाला मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. तर पटेलनगर मतदारसंघातून सर्वात कमी म्हणजे चार उमेदवार रिंगणात आहेत.
अर्जाच्या छाननीनंतर ९०० उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले तर २१० उमेदवारांचे अर्ज सदोष असल्याने नाकारण्यात आले. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.