आपल्या ९१ वर्षीय मालकावर नाराज झाल्याने संतापलेल्या नोकराने त्यांचे अपहरण करण्याचा ठरवले. त्यासाठी नोकराने मालक आणि त्यांच्या पत्नीला बेशुद्ध केले. मात्र त्यांचे अपहरण करण्यासाठी त्यांना फ्रिजमध्ये कोंबल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दक्षिण दिल्लीतील जीके टू परिसरामध्ये उघडकीस आली आहे. यामध्ये संयुक्त राष्ट्रांसाठी काम करणारे माजी अधिकारी कृष्णा देव कोसला यांचा मृत्यू झाला आहे.

कोसला यांचे अपहरण करण्यासाठी त्यांच्या इथे काम करणाऱ्या किशन या २८ वर्षीय नोकराने आपल्या चार साथीदारांबरोबर एक प्लॅन बनवला. शनिवारी संध्याकाळी किशनने चहामधून कृष्णा आणि त्यांची पत्नी सरजो यांना गुंगीचे औषध दिले. दोघेहीजण बेशुद्ध पडल्यानंतर बेशुद्धावस्थेतच कृष्णा यांना चौघांनी चक्क फ्रिजमध्ये कोंबले. हा फ्रिज घराखालील टेम्पोमध्ये टाकून मालकाचे अपहरण करण्याचा या चौघांचा इरादा होता. फ्रिज घराखाली आणल्यांनतर तो टेम्पोमध्ये ठेवण्यात आला. हा टेम्पो कृष्णा यांच्या घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर या चौघांनी फ्रिजचा दरवाजा उघडला असता त्यांना कृष्णा यांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे समजले. घाबरलेल्या या चौघांनी एका निर्जनस्थळी कृष्णा यांचा मृतदेह पुरला आणि ते परत आले.

रविवारी पहाटे कृष्णा यांची पत्नी सरोज यांना जाग आली तेव्हा त्यांना घरामध्ये कोणीच अढळून आले नाही. तसेच घरातील फ्रिजही गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना घडलेला सर्व प्रकार फोनवरुन कळवला. गस्तीवर असणारी पोलीस व्हॅन तातडीने घटनास्थली दाखल झाली. नोकराने दिलेला चहा प्यायलानंतर आपल्याला गुंगी आल्याचे सरोज यांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी सर्वात आधी किशनला ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीमध्ये सर्व प्रकार उघडकीस आला. दोघांनाही गुंगीचे औषध दिल्यानंतर कृष्णा यांचे अपहरण करण्यासाठी त्यांना फ्रिजमध्ये टाकून तो फ्रिज टेम्पोतून घेऊन जाण्याचे आरोपींने ठरवले होते. कृष्णा यांना ठार मारण्याचा कोणताचा विचार नव्हता. आपल्याला केवळ कृष्णा यांच्या कुटुंबियांकडून खंडणीचे पैसे हवे होते असं किशनने पोलिसांना सांगितले. किशनने दिलेल्या माहितीनुसरा पोलिसांनी किशनच्या चार साथीदारांबरोबरच टेम्पो चालक प्रदीप यालाही अटक केली आहे. ‘मालक आपल्याला सतत टोमणे मारायचे आणि शिवीगाळ करायचे. त्याच्या या सततच्या टीकेला मी कंटाळलो होतो. त्यातूनच मी त्याचे अपहरण करण्याचा प्लॅन मागील दीड महिन्यांपासून करत होतो,’ अशी माहिती किशनने पोलिसांना चौकशीदरम्यान दिली.

पोलिसांनी इमारतीच्या सुरक्षारक्षकाकडे यासंदर्भात चौकशी केली असता किशन आणि काही व्यक्तींने कृष्णा यांच्या घरातून फ्रिज काढून तो टेम्पोत भरताना आपण पाहिले होते असं सांगितलं. ‘हा फ्रिज दुरुस्त करण्यासाठी नेत असल्याचे आपल्याला वाटले,’ असं सुरक्षारक्षक असणाऱ्या शामी याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी अटक करण्यात आलेला टेम्पो चालक प्रदीप याला टेम्पोमध्ये काय आहे याची माहिती नव्हती असा दावा त्याचा भाऊ ब्रिजपाल याने केला आहे.

संयुक्त राष्ट्रांसाठी काम केलेल्या कृष्णा यांनी अनेक परदेशवाऱ्या केल्या आहेत. त्याचा एक मुलगा ऑस्ट्रेलियात असून दुसरा दिल्लीतच राहतो. त्यामुळेच त्यांचे अपहरण केल्यास आपल्याला भरपूर पैसे मिळतील या विचाराने किशन आणि त्याच्या मित्रांनी कृष्णा यांचे अपहरण केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास सुरु केला आहे.