‘न भूतो, न भविष्यति’ अशी पावले उचलण्याचा सपाटाच जणू दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लावला आहे. प्रशासनातील भ्रष्टाचाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी आक्रमक पावले उचलत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेसाठी ‘भ्रष्टाचारविरोधी’ हेल्पलाइन सुरू केली आहे.
‘सध्या भ्रष्टाचाराने प्रत्येक नागरिकच त्रस्त आहे, पण या भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्याने सरकारला सहकार्य करणे गरजेचे आहे. आज तंत्रज्ञान क्रांतीमुळे प्रत्येकाकडेच फोन आहे. हा फोन हे भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचे सर्वात मोठे हत्यार आहे. तुम्ही आहात तिथून तुमच्या फोनवर ध्वनिमुद्रण किंवा ध्वनिचित्रमुद्रण करा. हेल्पलाइनवर आमच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाला कळवा. संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यास जाळ्यात ओढण्याचे काम आम्ही बरोबर पार पाडू, असे केजरीवाल यांनी सांगितले. सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत ही हेल्पलाइन सुरू असेल, असेही ते म्हणाले.