Delhi Assembly Election 2020: अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा ऐतिहासिक विजयासहित दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झाले आहेत. मतदानपूर्व चाचण्या आणि एग्झिट पोलमध्ये दिल्लीत पुन्हा ‘आप’ सत्तेत येणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले होते. हे सर्व अंदाज खरे ठरले आहेत. सोशल मीडियावर सगळीकडे अरविंद केजरीवाल यांचीच चर्चा आहे. मात्र यावेळी अरविंद केजरीवाल आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओत नेमकं काय आहे ?
कुणाल कामरा याने २०१९ मध्ये अरविंद केजरीवाल यांची एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत कुणाल कामराने अरविंद केजरीवाल यांना २०२० मध्ये विधानसभा निवडणुकीत किती जागा मिळतील असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना अरविंद केजरीवाल यांनी ६० जागा येतील असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. त्यांचा हा दावा अगदी खरा ठरल्याचं दिसत आहे.

मुलाखतीत काय बोलले होते ?
सध्या २०१९ ची निवडणूक आहे, नंतर २०२० मध्ये विधानसभा निवडणूक आहे. मग नेमका तुमचा काय प्लान आहे. अनेकजण तुम्हाला पुन्हा ६७ जागा मिळणं कठीण असल्याचं सांगत आहेत असं कुणाल कामरा विचारतो. यावर केजरीवाल किती जागा मिळतील असं बोललं जा आहेत असं विचारलं असता, कुणाल कामरा ४० जागा म्हणत आहेत. यावर केजरीवाल ४० नाही, खूपच कमी आहेत. जास्त येतील. ६० जागा येतील. यावर कुणाल कामरा ६० जागा नाही आल्या तर ही क्लिप चालवतील असंही म्हणतो. यावर केजरीवलाही हसत हा चालवा म्हणतात.

व्हिडीओत नेमकं कुठे बोलले आहेत – २९.३० ते ३०.०१

आज देशात नव्या राजकारणाचा जन्म झाला आहे – अरविंद केजरीवाल
हा दिल्लीचा नाही तर भारतमातेचा विजय असल्याचं सांगत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमधील नागरिकांचे आभार मानले आहेत. “दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा आपल्या मुलावर विश्वास ठेवला. हा माझा नाही तर दिल्लीकरांचा विजय आहे. त्या प्रत्येक कुटुंबाचा विजय आहे ज्याने मला आपला मुलगा मानून जबरदस्त समर्थन दिलं. स्वस्त वीज, चांगली शिक्षा मिळत असलेल्या त्या प्रत्येक कुटुंबाचा हा विजय आहे,” असं यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. “आज देशात नव्या राजकारणाचा जन्म झाला आहे. मत त्यालाच जो शाळा बनवणार, मोहल्ला क्लिनिक बनवणार, जो २४ तास वीज देणार हा संदेश दिल्लीकरांनी दिला आहे. हा पूर्ण देशाचा विजय आहे,” असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.