दिल्लीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीचं सरकार सत्तेत आलं आहे. दिल्लीकरांना भाजपा व काँग्रेसला नाकारत आम आदमी पार्टीला पाठिंबा दर्शवल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. खरंतर दिल्ली विधानसभा निवडणूक आप विरुद्ध भाजपा अशीच होती, असं म्हणायला हरकत नाही. कारण, मागीलवेळी आपलं खातं देखील उघडून न शकलेल्या काँग्रेसने यंदा देखील तोच कित्ता गिरवला. त्यांच्या पदरी पुन्हा भोपळाच आला. तर, त्या तुलनेत भाजपाच्या जागा मागील वेळेपेक्षा दुप्पट वाढल्याचे दिसून आलं. मात्र असं जरी असलं तरी भाजपाला दिल्लीकरांना नाकारलं हेच सत्य आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी यांनी पराभवाची स्वीकरत, आम्ही जनमतचा कौल मान्य करत असल्याचं म्हटलं आहे. याचबरोबर त्यांनी आम्ही द्वेषाचं राजकारण करत नसल्याचंही बोलून दाखवलं.

आम्ही द्वेषाचं राजकारण करत नाही, सबका साथ सबका विकास यावर आमचा विश्वास आहे. निवडणुकीच्या काळात अनेक प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात, मात्र, आम्ही कधीच इच्छा नव्हती की लोकांचा ६० दिवसांपर्यंत रस्ता रोखलेला असावा, आम्ही त्याचा कालपण विरोध केला आज देखील विरोध करत आहोत, असं मनोज तिवारी म्हणाले.

अनेकदा निवडणुकांचे निकाल हे आपल्या बाजुने लागत नाहीत, अशावेळी निराश व्हायचं नसतं. आम्हाला दिल्लीच्या जनतेचा निर्णय मान्य आहे. २०१५ च्या तुलनेत भाजपाची ताकद वाढली आहे. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना परिश्रम घेतले. दिल्लीत भाजपाच्या मताची टक्केवारी वाढली आहे. आता दिल्लीत दोन पक्षांमधील नव्या पर्वाला सुरूवात होत आहे, काँग्रेसच अस्तित्वच जवळपास नष्ट झालं आहे. त्यांच्या मतांची टक्केवारी निम्म्यावर आली आहे. आम्ही संपूर्ण तन्मयतेने काम करू, असं त्यांनी सांगितलं.

मी मतदारांचे आभार व्यक्त करतो, सर्व कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले. त्यांना देखील धन्यवाद देतो. याचबरोबर मी अरविंद केजरीवाल यांचे देखील अभिनंदन करतो, त्यांनी दिल्लीकरांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. आम्हाला अपेक्षित असलेलं यश का मिळालं नाही, याबद्दल विचारमंथन केलं जाईल. भाजपाच्या मतांची टक्केवारी ४० टक्के राहिली आहे. म्हणजे २०१५ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा वाढ झाली असं ते म्हणाले.