निवडणूक म्हटली की प्रचाराची वेगवेगळी तऱ्हा आलीच. दिल्लीत मात्र एक मोठा वर्ग अजूनही चालत्या फिरत्या पोस्टर्सच्या प्रभावाखाली वावरतो. सायकल रिक्षा व ऑटोच्या मागे पोस्टरवर दिमाखात झळकणाऱ्या नेत्यांमध्ये सध्या जुंपली आहे. रामलीला मैदानावर अण्णा हजारे उपोषणाला बसले होते तेव्हा- ‘मैं हूँ अन्ना’, मुझे चाहिए लोकपाल. असं काहीबाही लिहिलेली पोस्टर्स दिल्लीभर झळकली होती. त्यावर अरविंद केजरीवाल व किरण बेदी यांची एकत्रित छायाचित्रे होती.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हे दोन्ही नेते पुन्हा एकदा एकत्रितपणे पोस्टरवर अवतरली आहेत. एकीकडे केजरीवाल तर दुसरीकडे किरण बेदी. ‘तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवा- असं प्रश्नार्थक वाक्य व केजरीवाल यांच्या फोटोखाली ईमानदार तर बेदींच्या फोटोखाली अवसरवादी (संधीसाधू)! पोस्टर्स छापणाऱ्यांचा पत्ता नाही. पण कुणाच्या विरोधात हे पोस्टर आहे, हे सेकंदात लक्षात येते. बेदींनी या पोस्टरविरोधातच तक्रार दाखल केली. त्यामुळे ज्या ऑटोवर ही पोस्टर्स होती त्यांच्याविरोधात धरपकड सुरु झाली.  या पोस्टर्सचा ज्वर ओसरत नाही तोच कृष्णा नगर, नवी दिल्ली मतदारसंघात अजून एक पोस्टर अवतरले. अस्सल हरयाणवी फिल देणारे. केजरीवाल यांना बोलक्या पोपटाची उपमा देणारे. म्हणजे शरीर पोपटाचे व चेहरा केजरीवाल यांचा. त्याखाली लिहिलेले- मैं ईमानदार बाकी साब बेईमान- त्याशेजारी- ठळक अक्षरात अपने मूँह -मियाँ मिठ्ठू. थोडक्यात स्वतचेच कौतूक करणारा पोपट!  हे पोस्टर्स लावण्याचे पाचशे रूपये मिळतात. म्हणजे घराच्या भिंतीवर, ऑटो वा सायकल रिक्षावर लावा. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या खर्चाच्या मर्यादेचे उल्लंघन नाही. . ‘पाँच साल-केजरीवाल’ या पंचलाईनला तोड ‘अपने मूँह-मियाँ मिठ्ठू!’ परस्पर बदनामीनाटय़ाचा हा दुसरा अंक आहे. एक अंक मागील वर्षी पार पडला. केजरीवाल व बेदी परस्परांविरोधात बोलतात. केजरीवाल यांच्यावर थेट वार करणे भाजपवाले टाळत आहेत. म्हणजे आतापर्यंत केजरीवाल यांना एकाही भाजप नेत्याने निवडणूक प्रचारादरम्यान ‘भगौडा’ म्हटलेले नाही. ही उपाधी केजरीवाल यांना गतवर्षीच काँग्रेस-भाजप नेत्यांनी दिली. पण केजरीवाल यांच्यावर थेट वार केला जात नाही. मग पोस्टर्सच्या माध्यमातून केजरीवाल यांच्याविरोधात मोहीम सुरू आहे. आंदोलनकर्ते केजरीवालही राजकीय झाले आहेत. त्याशिवाय का किरण बेदी यांच्याविरोधात पोस्टर्स निघालीत?
– चाटवाला