News Flash

दिल्लीत ७ फेब्रुवारीला मतदान

दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी येत्या ७ फेब्रुवारीला मतदान होणार असून १० फेब्रुवारीला निकालानंतर आम आदमी पक्ष व भारतीय जनता पक्षापैकी दिल्लीचे तख्त कोण राखणार, यावर

| January 13, 2015 01:25 am

दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी येत्या ७ फेब्रुवारीला मतदान होणार असून १० फेब्रुवारीला निकालानंतर आम आदमी पक्ष व भारतीय जनता पक्षापैकी दिल्लीचे तख्त कोण राखणार, यावर शिक्कामोर्तब होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज, सोमवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना १४ जानेवारीला जारी होईल. तेव्हापासून २१ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २४ जानेवारीपर्यंत आहे. १० फेब्रुवारीला निकालाची घोषणा झाल्यानंतर ४ मे पर्यंत सत्तास्थापनेसाठी मुदत देण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांनी दिली. नांदेड जिल्ह्य़ातील मुखेड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमदेखील या वेळी जाहीर करण्यात आला.
मुखेडमध्ये १३ फेब्रुवारीला मतदान होणार असून १६ फेब्रुवारीला निकाल घोषित होईल. २७ जानेवारीपासून नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत. दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल. मतदानासाठी एकूण ११ हजार ७६३ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. दिल्लीत नव्याने नोंदणी केल्यानंतर मतदारांची एकूण संख्या १ कोटी ३० लाख इतकी असल्याचे संपथ यांनी सांगितले. गेल्या वर्षभरापासून दिल्लीत राजकीय अनिश्चिततेचे वातावरण आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर १८ फेब्रुवारीला दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. सरलेल्या वर्षांत प्रचंड बहुमताच्या जोरावर केंद्रात भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन केली. लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या सातही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र केंद्रात सलग १० व दिल्लीत सलग १५  वर्षे सत्ता हाकणाऱ्या काँग्रेस पक्षाचे सातही उमेदवार लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत खरी लढाई भाजप विरुद्ध आप यांच्यातच होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची कुणकुण लागल्यानेच भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा शनिवारीच आयोजित केली होती. वीज पुरवठादार कंपनी बदलण्यासाठी ‘पोर्टेबिलिटी’ची घोषणा पंतप्रधानांनी या सभेत केली होती. वाढते वीज दर, वीज कंपनी व सरकारी यंत्रणांच्या संगनमताने होणारा भ्रष्टाचार आदी प्रमुख मुद्दय़ांचा वापर आम आदमी पक्षाने गत निवडणुकीत काँग्रेस विरोधात केला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पंतप्रधानांनीच वीज पुरवठादार पोर्टेबिलिटीची घोषणा रामलीला मैदानावरील सभेत केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 1:25 am

Web Title: delhi assembly polls scheduled announced
Next Stories
1 रणजित सिन्हा यांच्यावरील आरोपांची चौकशी
2 भेदरलेल्या विद्यार्थ्यांचा पेशावरमधील लष्कराच्या शाळेत पुन्हा किलबिलाट
3 भारत व अमेरिका यांची खरी गुंतवणूक परराष्ट्र संबंधात -केरी
Just Now!
X