News Flash

“तुमच्या देवाचे हात रक्ताने बरबटलेत, लोक श्वासासाठी तडफडतायत आणि…”; ‘अमेरिकेतील मोदी भक्तां’ना खुलं पत्र

"तुमचा देव दावा करतो त्याप्रमाणे हिंदूंचा रक्षक आहे तर..."

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य: रॉयटर्स)

देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मागील काही दिवसांपासून मृतांच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याचं चित्र अनेक जागी दिसत आहे. ऑक्सिजन बेड्स, औषधे आणि मूलभूत उपचार यंत्रणा अपुऱ्या पडत असल्याच्या तक्रारी देशातील अनेक राज्यांमधून समोर येत आहे. असं असतानाच दिल्लीतील लेखिका विनीता मोक्किल यांनी एक खुलं पत्र लिहिलं आहे. हे पत्र विनीता यांनी ‘अमेरिकन मोदी भक्तांसाठी’ ओपन लेटर या पद्धतीने लिहिलं आहे. या पत्रामध्ये सध्या देशात सुरु असणाऱ्या राजकरणाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील मोदी भक्तांनी भाजपाला आर्थिक मदत करु नये असं आवाहन विनीता यांनी केलं आहे.

विनीता यांनी ‘अमेरिकन मोदी भक्तांना’ लिहिलेल्या पत्रामध्ये सत्ताधाऱ्यांनी करोनाच्या साथीच्या कालावधीमध्ये भारतातील आरोग्यव्यवस्थेची परिस्थिती अजून चिंताजनक करुन ठेवल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या लोकांना तुम्ही आर्थिक करणं थांबवा आणि या माध्यमातून त्यांनी करोना काळात केलेल्या चुकीच्या कामांची त्यांना शिक्षा द्या. विनीता यांच्या पत्रावरील काही कमेंट्समध्ये वाचकांनी विनीता यांचं कौतुक केलं असून या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या मनातील भावना मांडल्याचं म्हटलं आहे. तर काही भाजपासमर्थकांनी विनीता यांनी या पत्राच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय.

“अमेरिकन मोदी भक्तांसाठी एक खुलं पत्र : तुमच्या देवाचे पाय मातीने तर हात रक्ताने बरबटलेले आहेत” अशा मथळ्याखाली विनीता यांनी लिहिलेला लेख बुधवारी दक्षिण आशियातील अमेरिकेसंदर्भातील वृत्तांकन करणाऱ्या ‘अमेरिकन कहानी’ या वेबसाईटवर प्रकाशित झाला. विनीता यांनी ‘द टेलीग्राफ’शी यासंदर्भात खास चर्चा केली. त्यावेळी त्यांनी, “आत्मपरिक्षण करण्यासाठी मोदी भक्तांसाठी ही अगदी योग्य वेळ आहे. खास करुन ज्यांनी राम मंदिराच्या नावाने मतं दिली होती आणि आता त्यांना या साथीचा फटका बसलाय, त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे,” असं म्हटलं आहे.

एकीकडे भारतीय श्वास घेण्यासाठी तडफडत आहेत आणि दुसरीकडे भक्तांचा हा देव स्वत:साठी महल बांधण्याची तयारी करतोय अशी टीकाही विनीता यांनी केलीय. “भारतातील लोक श्वास घेण्यासाठी तडफडत आहेत. लोकं ऑक्सिजनमुळे तडफडत मरत आहेत, आजारी रुग्ण रस्त्यावर पडत आहेत, बेड्ससाठी रुग्णालयांसमोर रांगा लागलेल्या आहेत, असं असतानाच तुमचा देव दिल्लीमध्ये स्वत:साठी २२ हजार कोटींचं महल बांधण्याची तयारी करत आहे,” असं विनीता यांनी पत्रात म्हटलं आहे. “तुमच्या देवाने त्याच्या या स्वार्थी योजनेच्या नादात सरकारने पुरेसा लसींचा पुरवठा करण्यासंदर्भातील निर्देश देणं विसरुन गेला. लसीकरण ही एकमेव गोष्ट होती जी भारतीयांना दुसऱ्या लाटेतून वाचवू शकली असती,” असंही विनीता यांनी पत्रात म्हटलं आहे.

केवळ निवडणुका जिंकण्यासाठी जय श्री रामच्या घोषणा दिल्या जातात असा आरोपही विनीता यांनी केलाय. “तुमचा देव हिंदूंना मुस्लिमांविरोधात उभा करतो आणि दोघांमधील तणाव वाढल्यानंतर माचिस लावण्याचं कामही तुमचा हाच देव करतो,” असंही विनीता यांनी म्हटलं आहे. “हिंदू राष्ट्रासाठी दाढीवाला बाबा झालेला तुमचा देव दावा करतो त्याप्रमाणे हिंदूंचा रक्षक आहे, तर मग आपल्या समर्थकांना करोनाचा संसर्ग होईल यासंदर्भात सर्व काही ठाऊक असताना त्यांनी कुंभमेळ्याचं आयोजन करण्याची परवानगी का दिली?”, असा प्रश्न विनीता यांनी पत्रातून विचारलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 9:01 am

Web Title: delhi based author asks modi bhakts in america to stop funding the current political dispensation scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथ ग्रहण सोहळा, ४३ मंत्र्यांचा समावेश
2 थायलंडच्या महिलेचा उत्तर प्रदेशात मृत्यू; भाजपा खासदाराच्या मुलाने ‘कॉल गर्ल’ आणल्याचा आरोप
3 करोना रुग्णांच्या मृतदेहावरील कपडे चोरुन त्यावर ब्रॅण्डेड कंपन्यांचे लोगो लावून विकणारी टोळी अटकेत
Just Now!
X