विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या दौऱ्यावर निघालेले आम आदमी पक्षाचे प्रमूख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रेल्वे स्टेशनवर महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांचा निषेध करत त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. केजरीवाल यांनी महिलांशी बोलण्याऐवजी त्यांना टाळल्यामुळे चिडलेल्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली.
अरविंद केजरीवाल हे गुरूवारी पंजाबच्या दौऱ्यावर जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेले होते. त्यावेळी आधीपासून तिथे उभ्या असलेल्या भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सेक्स स्कँडलबद्दल विचारणा केली. तसेच त्यांनी आपचे नेते आशुतोष यांच्याबद्दलही खुलासा करावा अशी अपेक्षा महिलांची होती. परंतु केजरीवाल हे त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता रेल्वेत जाऊन बसले. यादरम्यान चिडलेल्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. केजरीवाल यांनी आमच्याशी बोलायला हवे होते. त्यांनी असा पळ काढायचा नव्हता अशी प्रतिक्रिया एका महिलेने केली.
पंजाबमधील पक्षांतर्गत असलेले मतभेद दूर करण्यासाठी केजरीवाल हे चार दिवसांच्या दौऱ्यावर निघाले आहेत.