मध्य दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर शुक्रवारी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटाची तीव्रता फारच कमी होती. बॉम्बस्फोट झालेल्या परिसराला सुरक्षा पथकांनी घेराव घातला असून यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. विजय चौकपासून दोन किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर असलेल्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ सदस्य उपस्थित असलेल्या विजय चौकवर सैन्याचा ‘बिटिंग रिट्रिट’ सोहळा सुरू असतानाच हा बॉम्बस्फोट घडला. या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. तसेच, गृहमंत्री अमित शाहदेखील दिल्ली पोलिसांशी सातत्याने संपर्कात असून घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

“दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाबाबत इस्त्रायलचे परराष्ट्र मंत्री गाबी अश्केनाझी यांच्याशी मी संवाद साधला आहे. या स्फोटाची सरकारने गंभीर दखल घेतली असून इस्त्रायली दूतावासातील कर्मचारी आणि शिष्टमंडळतील सदस्य यांना संपूर्ण सुरक्षा पुरवली गेली आहे. घडलेल्या प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींबाबत कोणतीही हयगय केली जाणार नाही”, असे प्रतिपादन एस जयशंकर यांनी केले आहे.

बॉम्बस्फोटाबाबत अधिक माहिती म्हणजे, IEDच्या स्वरुपातील ही स्फोटके प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून पदपथावर ठेवलेली होती. स्फोटामुळे त्या भागात पार्क केलेल्या चार ते पाच गाडयांच्या काचा फुटल्या. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी दाखल झालं. अग्नीशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या.