नवी दिल्लीत इस्रायली दूतावासाबाहेर काल संध्याकाळी बॉम्ब स्फोट झाला. या बॉम्ब स्फोटामुळे सर्वच यंत्रणा सर्तक झाल्या आहेत. काल दिल्लीत बिटिंग रिट्रिटचा सोहळा सुरु होता. त्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता खूप कमी होती. कोणीही जखमी झाले नाही. फक्त पार्क केलेल्या काही गाड्यांच्या काचा फुटल्या. स्फोट कमी तीव्रतेचा असला, तरी त्यामागे संदेश देण्याचा हेतू होता. त्यामुळे भारतातील प्रमुख तपास यंत्रणा या स्फोटाचा तपास करत आहेत.

“वेगवेगळया देशातील इस्रायली दूतावासांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे दिल्ली बॉम्ब स्फोटाचे आश्चर्य वाटत नाही. इस्रायलच्या तपास यंत्रणा भारतीय यंत्रणांसोबत मिळून स्फोटाचा तपास करत आहेत” असे इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन मल्का म्हणाले.

“दूतावासातील सर्व कर्मचारी आणि अन्य स्टाफ पूर्णपणे सुरक्षित आहे. हा बॉम्ब स्फोट म्हणजे दूतावासावरील दहशतवादी हल्लाच आहे. या स्फोटामागे जे, कोण आहेत, त्यांना शोधून काढण्यासाठी आम्ही भारतासोबत मिळून तपास करत आहेत. आत्ताच कुठल्याही गटाचे नाव घेणे खूप घाईचे ठरेल” असे रॉन मल्का इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना म्हणाले.

आणखी वाचा- दिल्ली बॉम्बस्फोट : “हा तर फक्त ट्रेलर आहे”; ‘त्या’ पत्रात कासिम सुलेमानींचाही उल्लेख

“हा तर फक्त ट्रेलर आहे”
इस्रायली दूतावासाजवळ कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट झाल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून, परिसरातील तीन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक कॅब दिसून आली आहे. या कॅबने दोन लोकांना घटनास्थळी सोडलं होतं. त्यानंतर कॅब निघून गेल्याचं दिसत आहे.

कॅबमधून उतरल्यानंतर दोन्ही व्यक्ती ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, तिथे पायी जात असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. सीसीटीव्ही ही माहिती मिळाल्यानंतर स्पेशल सेलने कॅब चालकाशी संपर्क केला असून, दोन्ही व्यक्तींची स्केच तयार केली जात आहे. बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी पोलिसांना बरंच साहित्य मिळालं असून, यात एक लिफाफा सापडला. लिफाफ्यात एक चिठ्ठी होती. या चिठ्ठीत ‘हा तर फक्त ट्रेलर आहे.’ असा इशारा देणारा मजकूर लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या चिठ्ठीत इराण लष्कराचे कमांडर कासीम सुलेमानी आणि अण्वस्त्र शास्त्रज्ञ मोहसीन फखरजादेह यांच्या नावांचा शहीद असा उल्लेख करण्यात आलेला आहे.