News Flash

दिल्ली बॉम्बस्फोट : “हा तर फक्त ट्रेलर आहे”; ‘त्या’ पत्रात कासिम सुलेमानींचाही उल्लेख

स्फोटामागे इराणमधील दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय

घटनास्थळाची पाहणी करताना तपास अधिकारी. (छायाचित्र...एएनआय)

राजधानी दिल्लीत असलेल्या इस्रायली दूतावासाजवळ शुक्रवारी रात्री बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली होती. या ठिकाणी पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली होती. या चिठ्ठीतून या हल्ल्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा संकेत मिळत आहे. पोलिसांनी परिसरातील तीन सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली. त्याचबरोबर सापडलेल्या चिठ्ठीत हा तर फक्त ट्रेलर आहे, असा इशारा देण्यात आल्याचं समोर आलं आहे.

इस्रायली दूतावासाजवळ कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट झाल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून, परिसरातील तीन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक कॅब दिसून आली आहे. या कॅबने दोन लोकांना घटनास्थळी सोडलं होतं. त्यानंतर कॅब निघून गेल्याचं दिसत आहे.

कॅबमधून उतरल्यानंतर दोन्ही व्यक्ती ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, तिथे पायी जात असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. सीसीटीव्ही ही माहिती मिळाल्यानंतर स्पेशल सेलने कॅब चालकाशी संपर्क केला असून, दोन्ही व्यक्तींची स्केच तयार केली जात आहे. बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी पोलिसांना बरंच साहित्य मिळालं असून, यात एक लिफाफा सापडला. लिफाफ्यात एक चिठ्ठी होती. या चिठ्ठीत ‘हा तर फक्त ट्रेलर आहे.’ असा इशारा देणारा मजकूर लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या चिठ्ठीत इराण लष्कराचे कमांडर कासीम सुलेमानी आणि अण्वस्त्र शास्त्रज्ञ मोहसीन फखरजादेह यांच्या नावांचा शहीद असा उल्लेख करण्यात आलेला आहे. दोघांचीही गेल्या वर्षी हत्या करण्यात आली होती. बगदाद विमानतळाजवळ कासीम सुलेमानी यांची ड्रोन हल्ला करून हत्या करण्यात आली होती.

आणखी वाचा- ‘हा’, दहशतवादी हल्लाच, इस्रायलचे भारतातील राजदूत म्हणाले…

दिल्ली पोलिसांच्या एका पथकानं बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. त्याचबरोबर तिथे आढळून आलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत. शीतपेयाच्या बॉटलचे तुकडे आणि बेअरिंगमधील छर्रे सापडले आहेत. सापडलेल्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, या घटनेच्या तपासासाठी इस्रायलमधील एक पथकही भारतात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 10:30 am

Web Title: delhi blast updates letter calls it a trailer cctv shows cab dropping off 2 men near blast site bmh 90
Next Stories
1 आरोग्य सेवेच्या अभावापेक्षा खराब गुणवत्तेमुळेच सर्वाधिक मृत्यू
2 ताजमहालच्या संरक्षित क्षेत्रातील चार हजार झाड कापण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
3 कर्नाटक : विधान परिषदेच्या सभागृहात काँग्रेस नेता पाहत होता पॉर्न व्हिडीओ
Just Now!
X